मराठवाडा पाणीप्रश्नावर भाजपा एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 01:55 AM2018-10-19T01:55:09+5:302018-10-19T01:55:27+5:30

नाशिकच्या पाणीप्रश्नावर महापालिकेच्या विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपाला एकाकी पाडले असून, मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत येत्या मंगळवारी नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष तसेच पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.

Marathwada water problem is the BJP alone | मराठवाडा पाणीप्रश्नावर भाजपा एकाकी

मराठवाडा पाणीप्रश्नावर भाजपा एकाकी

Next
ठळक मुद्देविरोधी पक्षांची मंगळवारी बैठक : भाजपावर जोरदार टीका

नाशिक : नाशिकच्यापाणीप्रश्नावर महापालिकेच्या विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपाला एकाकी पाडले असून, मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत येत्या मंगळवारी नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष तसेच पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे.
यासंदर्भात मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या कार्यालयात सर्व विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक झाली. त्यात मराठवाड्याला पाणी देण्यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्णातून पाण्याची मागणी केली जात आहे. त्यास नगर जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोध दर्शविल्याने त्याच धर्तीवर नाशिकचे पाणी पुन्हा पळवू न देण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येत आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे. गंगापूर धरणात आधीच पाणी साठा कमी आहे. त्यात मराठवाड्याला पाणी दिल्यास नाशिकवर पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण होऊ शकते. यामुळे २०१६ मध्ये सर्वपक्षीय नाशिककरांनी केलेल्या आंदोलनाप्रमाणेच पुन्हा एकत्र येऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली. येत्या मंगळवारी पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन वस्तुस्थिती तपासली जाणार असून, न्यायालयाच्या आडून शासन धाक दाखवत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. नाशिकच्या पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना मराठवाड्याला सिंचनासाठी का पाणी द्यायचे असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. नाशिकबाबत शासन नेहमीच टोकाचा भेदभाव करत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असून, नाशिकला कुणीच वाली नसल्यामुळे धरणातून पाणी पळवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे असे होऊ नये यासाठी नाशिककरांसाठी लढा उभारण्यात येणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.
विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पाडणार असल्यानेच सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधी पाणीविषयक नाशिककरांची बाजू घेऊन ढोंग करत असल्याचा आरोप कॉँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी केला. सत्ताधारी पक्षाचे नाशिकवर पूतना मावशीचे प्रेम आहे. औरंगाबादसह परिसरातील बिअर व मद्याच्या कारखान्यांना पाणी देण्यासाठी पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु, नाशिककर तो प्रयत्न हाणून पाडतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिला. सत्ताधारी नाशिककरांची घोर फसवणूक करत आहे. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न आहे. वस्तुस्थिती नजरेआड करून मराठवाड्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी सांगितले. पाणीप्रश्नी शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे, भारिप, रिपाइं, भाकप, माकप, बसपा यांसह सर्व पक्ष एकत्रित लढा देणार असल्याचे सांगण्यात आले.
आमदारांचा खरपूस समाचार
आमदार देवयानी फरांदे यांनी मराठवाड्यास पाणी देण्यास विरोध दर्शवित सर्वपक्षीयांची मोट बांधून विरोध करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर विरोधी पक्षांनी आमदार फरांदे यांचा खरपूस समाचार घेतला. आधी तीन आमदार आणि शहर भाजपाची मोट नीट बांधा मग सर्वपक्षीयांची मोट बांधा, असा सल्ला बोरस्ते यांनी दिला. २०१६ मध्ये सर्वपक्षीय लढा देत असताना भाजपाने स्वत:ला दूर ठेवले. आता पालकमंत्री जलसंपदा खात्याचे मंत्री आहे. यामुळे त्यांनी पालकत्व निभवावे. आमदार सत्ताधारी असल्याने त्यांनी नाशिकची बाजू भक्कमपणे मांडून न्याय द्यावा. आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी पॅकेजची घोषणा करण्याऐवजी तिथलेच पाणी पळविले जात असल्याचे बोरस्ते म्हणाले.

Web Title: Marathwada water problem is the BJP alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.