मार्केंडपिंप्रीतून पाणी न सोडल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:12 AM2018-03-29T00:12:10+5:302018-03-29T00:12:10+5:30
सप्तशृंगगडावरील आदीमायेच्या चैत्रोत्सवासाठी मध्य प्रदेशसह धुळे, जळगाव, नंदुरबार या आदीमायेच्या खान्देशातून पायी येणाऱ्या भाविकांसाठी चणकापूर, गोबापूर, मार्केंडपिंप्री धरणातून नदीपात्रात पाणी सोडले नसल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली असून, कळवण तालुक्यातील आठंबे, गोबापूर गावाजवळील नदीपात्रात असलेल्या अस्वच्छ (गाळ असलेल्या) पाण्याचा अंघोळीसाठी उपयोग करून देवीच्या दर्शनाची आस लागलेले देवीभक्त पायी अनवाणी मजल दरमजल करीत सप्तशृंगगडाकडे मार्गस्थ होताना दिसत आहे.
कळवण : सप्तशृंगगडावरील आदीमायेच्या चैत्रोत्सवासाठी मध्य प्रदेशसह धुळे, जळगाव, नंदुरबार या आदीमायेच्या खान्देशातून पायी येणाऱ्या भाविकांसाठी चणकापूर, गोबापूर, मार्केंडपिंप्री धरणातून नदीपात्रात पाणी सोडले नसल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली असून, कळवण तालुक्यातील आठंबे, गोबापूर गावाजवळील नदीपात्रात असलेल्या अस्वच्छ (गाळ असलेल्या) पाण्याचा अंघोळीसाठी उपयोग करून देवीच्या दर्शनाची आस लागलेले देवीभक्त पायी अनवाणी मजल दरमजल करीत सप्तशृंगगडाकडे मार्गस्थ होताना दिसत आहे. चैत्रोत्सवात पाणी सोडण्याची दरवर्षाची परंपरा प्रशासनाने खंडित केली आहे. गोबापूर धरणात २४.८७ दशलक्ष घनफूट तर मार्केंडपिंप्री धरणात १५.२८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. देवीभक्तांची पाण्यावाचून गैरसोय होत असल्याने चणकापूर, गोबापूर व मार्केंडपिंप्री धरणातून तत्काळ पाणी सोडावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ैजयश्री पवार यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे. सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवाला रामनवमीपासून सुरु वात झाली असून, महाराष्ट्रातील व शेजारील राज्यातील लाखो देवीभक्तांनी मनोभावे पूजा करून देवीचरणी नतमस्तक झाले. चैत्रोत्सव कालावधीत मध्य प्रदेश, धुळे, जळगाव, नंदुरबार या खान्देश भागातून येणाºया भाविकांसाठी चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात तर गोबापूर व मार्केंडपिंप्री धरणातून बेहडी नदीपात्रात आतापर्यंत दरवर्षी पाणी सोडण्यात येते. यंदा मात्र चैत्रोत्सव सुरू होऊन चार दिवसांचा कालावधी लोटला तरी पाणी सोडण्यात आले नसल्याने नदीपात्रातील अस्वच्छ पाण्याचा अंघोळीसाठी वापर करताना दिसून येत आहे. रस्त्यावरील विहिरीवर देवीभक्तांची गर्दी दिसून येत असल्याने प्रशासनाच्या नकारघंटा भूमिकेमुळे लाखो देवीभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाला असला तरी विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. मानूर, साकोरे, आठांबे, गोबापूर, नांदुरी येथे तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अशा टंचाई काळात साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव रामनवमीपासून सुरू झाला आहे. देवीभक्तांना या पाण्याचा उपयोग होत नाही अशी तक्रार मार्केंडपिंप्री येथील ग्रामस्थांनी केली असून, पाणी सोडण्यास हरकत घेतली असल्याने पाणी सोडण्याची महसूल प्रशासनाने नकारघंटा वाजवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बेहडी नदीपात्र कोरडेठाक
देवीभक्तांची पाण्यावाचून गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे विभाग दरवर्षी गोबापूर व मार्केंडपिंप्री धरणातून अनुक्र मे १० व ७ असे १७ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करून चैत्रोत्सव काळात बेहडी नदीपात्रात सोडले जाते. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सोडण्यात येते. यंदा मात्र मार्केंडपिंप्री व गोबापूर धरणातून पाणी सोडण्यात आले नसल्याने बेहडी नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. बेहडी नदीपात्रात चैत्रोत्सवात पाणी सोडले तर ठिकठिकाणी सीमेंट बंधारे बांधण्यात आले असल्याने ते सर्व बंधारे भरले जातात.