कळवण तालुक्यात झेंडूची शेती बहरली...
By admin | Published: September 13, 2014 09:25 PM2014-09-13T21:25:25+5:302014-09-13T21:25:25+5:30
कळवण तालुक्यात झेंडूची शेती बहरली...
कळवण : नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी सणासाठी झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेती व्यवसायाबरोबर नवनिर्मितीचा ध्यास घेऊन तालुक्यात झेंडूची शेती केल्याने झेंडूची शेती बहरली आहे. अनेक शेतकरी आता झेंडू शेतीकडे वळले आहेत.
उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या यात्रोत्सवात देशाच्या विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात, या परिसरातील आदिवासी बांधव यात्राकाळाच्या पार्श्वभूमीवर झेंडूची लागवड करतात, मात्र फुलांची मागणी अधिक असल्याने शिर्डी व अन्य शहरातून झेंडूची आयात केली जात ेहोती. कालांतराने तालुक्यातीलच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झेंडूचे उत्पादन करण्यास सुरुवात केल्याने सप्तशृंग गडाबरोबरच राज्यातल्या अन्य ठिकाणीही झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी होते. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात तसेच दिवाळीत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. मुंबईत दादर येथे तर गुजरातमधल्या अहमदाबाद येथेही झेंडूला मोठी बाजारपेठ असून, तालुक्यातील बहुसंख्य झेंडू उत्पादक शेतकरी आपला माल या ठिकाणी विक्रीस नेत असतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो असलेला भाव नवरात्रोत्सव व दिवाळीच्या काळात ९० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.
कळवण तालुक्यात आजमितीस निवाणे, पाळे खुर्द, पाळे बुद्रुक, दह्याणे, आठंबे, पाळे पिंपरी आदि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात झेंडू लागवड केली जात आहे. योग्य नियोजन व योग्य भाव हे झेंडू फूलशेतीच्या लागवडीचे गमक असून, झेंडू लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षापासून झेंडू शेतीविषयी कृषी विभागाकडून मार्गदर्शन व सल्ला मिळत असल्याने झेंडू शेतीकडे कल वाढला असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.
लागवड केल्याच्या ४५ दिवसांनंतर झेंडू फुले निघण्यास सुरुवात होते. झेंडूची लागवड लाभदायी असून, त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे झेंडू उत्पादक शेतकरी बांधवांनी सांगितले.