डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू; आरोप
By admin | Published: October 20, 2015 12:03 AM2015-10-20T00:03:41+5:302015-10-20T00:04:41+5:30
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू; आरोप
घोटी : येथील एका डॉक्टरने विवाहित महिलेवर प्रसूतीदरम्यान उपचार करण्यास हलगर्जीपणा केल्याने विवाहितेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत विवाहितेच्या नातलगांनी घोटी पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील आडवन येथील माहेर असलेली सुनीता पुनाजी सराई ही विवाहिता बाळांतपणासाठी माहेरी आली होती. तिला प्रसूतीसाठी आई वडिलांनी घोटी येथील खासगी
रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्याने सुलभ प्रसूती होणार नसल्याचे सांगत सदर महिलेला तब्बल चौदा दिवस रुग्णालयात ठेवले.
दि. १७ रोजी महिलेची सुखरूप प्रसूत्ती झाल्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या. यामुळे तिला घोटीतीलच दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिथेही प्रकृती गंभीर झाल्याने तिला नाशिकला खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. तरीही नाशिक येथील रुग्णालयाने तिला अतिदक्षता विभाग दाखल करून घेऊन बिल अदा केल्यानंतर मृत घोषित केले. दरम्यान, या महिलेच्या मृत्यूनंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन अहवालात सदर महिलेचे सीझर झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत मृत विवाहितेचा पती पुनाजी मंगा सराई याने घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे.
दरम्यान, उपचार करताना डॉक्टराने हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप नातलगांनी केला असून, केवळ बिलाच्या हव्यासापोटी चौदा दिवस रुग्णालयात दाखल केल्याने तिचा मृत्यू झाला. या मृत्यूस संबंधित डॉक्टरासर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना काशीनाथ मेंगाळ यांच्यासह कावजी ठाकरे, काशीनाथ वारघडे, देवराम भस्मे, लहानू हिंदोळे, कमळू कडाळी, संजय लोते आदिच्या शिष्टमंडळाने दिले. (वार्ताहर)