बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 01:29 AM2021-11-24T01:29:58+5:302021-11-24T01:31:06+5:30
बाजार समित्यांची निवडणूक घेण्यापुर्वी सहकारी सोसायट्यांच्या निवडणूका घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादी जाहीर करण्याचा व त्यावर हरकती मागविण्याचा कार्यक्रमही बंद करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता सर्वप्रथम सोसायट्यांची निवडणूक होणार आहे.
नाशिक : बाजार समित्यांची निवडणूक घेण्यापुर्वी सहकारी सोसायट्यांच्या निवडणूका घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादी जाहीर करण्याचा व त्यावर हरकती मागविण्याचा कार्यक्रमही बंद करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता सर्वप्रथम सोसायट्यांची निवडणूक होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सतरा बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रीया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. आता मात्र ही सारी प्रक्रीयाच रद्द ठरली आहे. राज्यातील ज्या बाजार समित्यांची मुदत २३ ऑक्टोंबर २०२१ पुर्वी संपुष्टात आल्या आहेत अशा बाजार समित्यांची निवडणूक घेण्याची घोषणा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने केली होती व त्यासाठी बाजार समित्यांना निवडणूक मतदार यादी तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. साधारणत: जानेवारीत निवडणूका होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना या संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत बाजार समित्यांच्या निवडणुकीत सोसायटी गट असून, कोरोनामुळे बहुतांशी सोसायट्यांच्या निवडणूका झालेल्या नाहीत तसेच ग्रामपंचायतीच्याही निवडणूक झालेल्या नाहीत त्यामुळे या गटातील सदस्यांना मतदानापासून वंचित रहावे लागणार असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. त्याची दखल घेत न्यायालयाने अगोदर सोसायट्यांच्या निवडणुका व नंतर बाजार समित्या असा निर्देश दिला. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणूका रद्द करण्यात आल्या आहेत.
चौकट===
पुन्हा मुदतवाढ की प्रशासक?
बाजार समित्यांची मुदत गेल्या वर्षीच संपुष्टात आली असून, विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली आहेे. बाजार समिती कायद्यानुसार संचालक मंडळास दोनच वेळा मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. यापुर्वीच दोन मुदतवाढ देण्यात आली असल्याने २३ ऑक्टोबर अखेर मुदत संपुष्टात आलेली आहे. आता निवडणुकीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याने बाजार समितीवर प्रशासक की पुन्हा मुदतवाढ असा प्रश्न निर्माण झाला आहे.