बाजार समिती ठप्पच
By admin | Published: July 11, 2016 12:29 AM2016-07-11T00:29:54+5:302016-07-11T00:39:08+5:30
शुकशुकाट : व्यापाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरूच
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीमधून भाजीपाला व कृषीमालाचे लिलाव मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी शनिवारी (दि.९) लिलावावरील बहिष्कार कायम ठेवल्याने दुसऱ्या दिवशीही व्यवहार ठप्प होते. बंदचा सर्वाधिक फटका कांदा व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, बंद सुरू राहणार असल्याचे संकेत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
जिल्ह्यातील मुख्य बाजार समित्यांसोबतच उपबाजार समित्यांमध्येही व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकला आहे. जिल्हाभरातून येणारा हजारो टन शेतमाल व्यापारी व अडत्यांमार्फत ग्राहकांपर्यंत जातो. परंतु व्यापाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाने ही व्यवस्था ठप्प झाली आहे. हजारो टन शेतमालाचे काय करायचे असा प्रश्न प्रशासनाला पडल्याने शनिवारी जिल्हा यंत्रनेकडून व्यापाऱ्यांना ४८ तासांचा वेळ देण्यात आला असताना व्यापारी रविवारीही बेमुदत आंदोलनाच्या भूमिके वर ठाम राहिले. एकीकडे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाल्यासारखा नाशवंत माल शेतात ठेवणे शक्य नाही. तर दुसरीकडे लिलाव बंद असल्याने मालाची विक्रीही होत नाही. अशा स्थितीत शासन आणि व्यापाऱ्यांच्या संघर्षात शेतक ऱ्यांची मात्र कोंडी होत आहे.
दरम्यान, शासनाच्या निर्णयामुळे व्यापारी उचललेल्या मालाचे पैसे भरत नसल्याने आडत्यांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे आडत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)