बाजार समिती, व्यापाऱ्यांचा तिढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:06+5:302020-12-14T04:30:06+5:30
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य किराणा व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या एक टक्का सेवा शुल्काविरोधात नाशिकमधील घाऊक धान्य ...
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य किराणा व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या एक टक्का सेवा शुल्काविरोधात नाशिकमधील घाऊक धान्य किराणा व्यापारी व किरकोळ किराणा व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. व्यापाऱ्यांनी सेवा शुल्क देण्यास केलेला विरोध व बाजार समिती संचालक मंडळाने शुल्क वसुलीसंदर्भात घेतलेली भूमिका यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून निर्माण झालेला तिढा कायम असून, रविवारी दिवसभर बाजार समितीतील पदाधिकारी आणि व्यापारी संघटनांचे शिष्टमंडळ यांच्यात हा तिढा सोडविण्यासाठी दिवसभार खल सुरू होता.
घाऊक धान्य किराणा व्यापारी संघटनेने गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाजार समितीत व्यवहार बंद ठेवून आक्रमक भूमिका घेत सेवा शुल्क वसुलीला विरोध केला आहे. व्यापारी संघटनांनी बाजार समिती आवारात सर्व व्यवहार बंद ठेवून शुल्क वसुलीविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर
व्यापारी आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये या मुद्यावर शुक्रवारी झालेली बैठक फिस्कटल्यानंतर शनिवारी संपूर्ण शहरातील किराणा व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून शुल्क वसुलीला विरोध दर्शविला; मात्र त्यानंतरही बाजार समितीतील पदाधिकारी सेवा शुल्क वसुलीच्या निर्णयावर ठाम राहिल्याने व्यापारी आणि बाजार समिती पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळामार्फत बाजार समिती पदाधिकाऱ्यांसोबत चर्चेचे प्रयत्न सुरू करण्यात आले असून या शिष्टमंडळाच्या चर्चेतून सेवा शुल्काच्या मुद्यावर सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया घाऊक धान्य किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले. दरम्यान, बाजार समिती आवारात सलग तीन दिवस अन्नधान्य खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असून येथील व्यापाऱ्यांना सेवा शुल्काचा तिढा लवकरात लवकर सुटण्याची प्रतीक्षा आहे.
इन्फो-
बाजार समिती सेवा शुल्क वसुलीवर ठाम
कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेली संस्था असल्याचे सांगत व्यापाऱ्यांकडून घेतला जाणारा सेस रकमेच्या बदल्यात त्यांना गाळे, रस्ते, स्वच्छतागृह इत्यादी सुविधा पुरविल्या जात असल्याचे संचालक मंडळातील सदस्यांचे म्हणणे आहे. व्यापारी वर्गाने हा सेस भरला पाहिजे यासाठी संचालक मंडळातील काही सदस्यांनी बैठकीत आवाज उठवला असून बाजार समितीतील पदाधिकारीही शुल्क वसुलीच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.