राज्यव्यापी आंदोलनातही बाजार समित्या सुरूच ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:45+5:302020-12-06T04:13:45+5:30

लासलगाव : ज्या तातडीने कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली त्याच तातडीने आता कांद्याची निर्यात खुली करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र ...

Market committees continue in statewide agitation! | राज्यव्यापी आंदोलनातही बाजार समित्या सुरूच ठेवा!

राज्यव्यापी आंदोलनातही बाजार समित्या सुरूच ठेवा!

Next

लासलगाव : ज्या तातडीने कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली त्याच तातडीने आता कांद्याची निर्यात खुली करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे; परंतु त्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीने आपले कांदा लिलावाचे कामकाज बंद ठेवू नये, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.

सुरुवातीला लाॅकडाऊनच्या काळामध्ये काही बाजार समित्या सलग २-२ महिने, काही बाजार समित्या कधी आठवडा तर कधी २ आठवडे अशा बंद राहिल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडाभरात नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज बंद होते. पुढे दिवाळीत नाशिक जिल्ह्याच्या बाजार समित्या १० दहा दिवस बंद होत्या. बाजार समित्यांचे कामकाज सतत बंद राहून पुन्हा सुरू झाल्यानंतर एकदम कांद्याची जास्त आवक होऊन कांद्याचे बाजारभाव अजून कोसळतात. कांदा उत्पादकांना त्याचा आर्थिक फटका बसतो. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नाशिक, धुळे, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांमध्ये तहसीलदार यांना कांद्याची निर्यातबंदी तत्काळ हटवावी, यासाठी निवेदन, पत्र देण्यात आले असून, पुढील आठवड्यात राज्यव्यापी रेल रोको व रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.

इन्फो

..तर बरखास्तीची कारवाई करा!

कांद्यावरील निर्यात खुली होत नाही तोपर्यंत राज्यभर राज्य कांदा उत्पादक संघटनेचा लढा सुरूच राहील; परंतु सुट्टीचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी राज्यातील बाजार समित्यांचे कांद्याचे लिलाव बंद राहिल्यास संबंधित बाजार समित्यांवर बरखास्तीची कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्य सरकारला करण्यात येईल, असेही दिघोळे यांनी स्पष्ट केले आहे.

इन्फो

शेतकरी हवालदिल

कांद्याचे बाजारभाव प्रतिक्विंटलला चार हजारांच्या घरात गेल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने १४ सप्टेंबर २०२० रोजी कांद्यावर निर्यातबंदी केली. त्यानंतर परदेशी कांदा आयात करणे सुरू केले तसेच कांदा व्यापारी यांना साठा मर्यादा घालून दिल्या. या आणि अशा अनेक एकामागून एक निर्बंधांमुळे कांद्याचे बाजारभाव घसरत राहिले. आता या आठवड्यात लासलगावसह महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याचे दर सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटल इतके घसरल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.

Web Title: Market committees continue in statewide agitation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.