जिल्ह्यातील बाजार समित्या सलग दहा दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 01:31 AM2021-10-30T01:31:32+5:302021-10-30T01:32:31+5:30
दिवाळीनिमत्त जिल्ह्यातील बाजार समित्या तब्बल दहा दिवस बंद राहाणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्याकडील माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लासलगावी दि. ३० ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत. भुसार मालाचे लिलाव मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. तर भाजीपाल्याचे लिलाव फक्त दोनच दिवस बंद राहणार आहे.
नाशिक : दिवाळीनिमत्त जिल्ह्यातील बाजार समित्या तब्बल दहा दिवस बंद राहाणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्याकडील माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लासलगावी दि. ३० ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत. भुसार मालाचे लिलाव मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. तर भाजीपाल्याचे लिलाव फक्त दोनच दिवस बंद राहणार आहे. चांदवड बाजार समितीत शनिवारी सकाळच्यावेळी धान्य लिलाव सुरू राहणार आहेत. येथे ९ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत.
सलग दहा दिवस बाजार समित्या बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. दिवाळीनंतर बाजार समित्या सुरू झाल्यानंतर मालाची आवक वाढते. यामुळे त्याचा दरावर परिणाम होतो. आधीच मागील दोन वर्षांपासून शेतीमालाला फारसे दर नाहीत. मागील पंधरा दिवसांपासून कांदा दरावरही मोठा परिणाम झाला आहे. उन्हाळ कांदा संपत आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्यांना आता कांदा विक्रीसाठी किमान दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोट-
दिवाळी असली तरी सलग दहा दिवस बाजार समित्या बंद ठेवणे हे उचित नाही. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना पैशांची गरज असते, पण आता त्यांना माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक प्रकारे हा शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचाच प्रकार आहे. एक-दोन दिवस व्यवहार बंद ठेवणे समजण्यासारखे आहे, पण इतके दिवस बंद ठेवून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे. बाजार समिती प्रशासनाने ही प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - अर्जुनतात्या बोराडे, जिल्हाध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना