कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 05:30 PM2017-10-26T17:30:25+5:302017-10-26T17:32:22+5:30
नाशिक : उन्हाळ कांद्याने भावात प्रती क्विंटलने साडे तीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर सरकारने पुन्हा व्यापार्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांद्याचे भाव हजार ते बाराशे रु पयांनी कोसळले. व्यापार्यांनी भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकर्यानी आज गुरुवारी सटाणा येथील बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला.
दरम्यान, बाजार समितीचे सभापती रमेश देवरे ,सचिव भास्करराव तांबे यांनी शेतकर्याच्या भावना समजून घेत दिवाळीमुळे व्यापार्याकडे मजुरांची टंचाई असल्यामुळे खरेदी केलेल्या कांद्याची विल्हेवाट लावता येत नाही. नव्याने कांदा खरेदी केल्यास शासनाला साठेबाजी दिसून येते अशा कात्रीत व्यापारी सापडल्यामुळे कांद्याचे भाव कोसळत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तब्बल तासाभराने आंदोलन मागे घेतले. सुमारे दोन तासानंतर कांद्याचे लिलाव पुर्ववत होऊ शकले.
यंदा खरीप कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट झाल्यामुळे उन्हाळ कांद्याला मागणी वाढल्यामुळे भावात तेजी आली आहे. दिवाळी नंतर उन्हाळ कांद्याची आवक वाढत असली तरी भावात मात्र गेल्या तीन दिवसांपासून तेजी राहिली आहे. कांद्याने प्रती क्विंटल साडे तीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर शासनाने पुन्हा व्यापार्यांच्या साठेबाजीवर मर्यादा आणून कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज सटाणा बाजार समितीच्या आवारात व्यापार्यानी मजूर टंचाईमुळे दररोज दोनशे वाहनेच कांदा खरेदी करण्याची भूमिका घेतली होती. त्यात एकाच दिवसात सरासरी भाव हजार ते बाराशे रु पयांनी कोसळल्याने संतप्त शेतकर्यानी लिलाव बंद पाडून बाजार समतिीच्या मध्यवर्ती कार्यालयावर हल्लाबोल केला.