बाजार समितीचे आठवडाभरात २५ लाख रुपये उत्पन्न घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:28+5:302021-05-18T04:14:28+5:30
पंचवटी : नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सलग १२ दिवस लॉकडाऊन केल्याने जीवनावश्यक वस्तू ...
पंचवटी : नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सलग १२ दिवस लॉकडाऊन केल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व आस्थापना व बाजारसमितीदेखील बंद करण्याचे आदेश दिल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे, तर बाजार समिती उत्पन्नात दैनंदिन साडेतीन ते चार लाख रुपये घट आल्याने आठवडाभरात जवळपास २५ लाखांनी उत्पन्न घटले आहे, अशी माहिती बाजार समिती सचिव अरुण काळे यांनी दिली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन जिल्हाभरातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. भाजीपाला खरेदी-विक्रीच्या माध्यमातून दिवसभरात सहा ते सात कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरेाना त्यातच भाजीपाला आवक घटल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाजार समिती बंद केल्याने दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शिवाय बाजार समितीला मिळणारे उत्पन्नदेखील बुडत आहे. खरेदी-विक्रीच्या माध्यमातून बाजार समितीला बाजार शुल्कातून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न रोज अपेक्षित असते. मात्र, आठवडाभरापासून बाजार समिती बंद असल्याने साधारणपणे पंचवीस लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
--इन्फो -
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
जिल्हा प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी थेट बाजार समिती बंद केल्या आहेत, त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. कोरोना नियम पालन करीत नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाला साकडे घातले होते. मात्र, परवानगी मिळाली नाही. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवली आहे, तर बाजार समिती बंदमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिवाय शेतमाल खराब होत असल्याने तो फेकून देण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे बाजार समिती बंद असल्याने बाजार समितीचे दैनंदिन तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.