दिवाळीनिमित्त झेंडूंनी बाजार फुलला
By admin | Published: October 30, 2016 12:56 AM2016-10-30T00:56:11+5:302016-10-30T00:57:46+5:30
आवक वाढली : खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी
नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फूलबाजारात झेंडूंची प्रचंड आवक वाढली असून, लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शहरातील फूलबाजारासह चौकाचौकांत विक्रेत्यांनी दुकाने लावल्याने फूलबाजार झेंडूने फुलला होता. गर्द पिवळा, फिकट पिवळा व नारंगी झेंडूच्या फुलांना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी होती. फूल आणि हार खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर घरांना झेडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहने, दुकाने अशा उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या ठिकाणांची आणि सामग्रीची लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर पूजा करण्याची प्रथा आहे. या पूजेसाठी प्रामुख्याने झेंडूचे हार आणि तोरण वापरले जाते. त्यामुळे झेंडूच्या फुलांसह आंब्याच्या पानांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. फूलविक्रेत्यांनी ठिकठिकणी दुकाने लावली आहे. बाजारात दसऱ्यापेक्षा दिवाळीत झेंडूची आवक वाढल्याने झेंडूचे भाव कोसळले असले तरी किरकोळ विक्रेत्यांकडून ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने फुलांची विक्री केली जात आहे, तर अनेक शेतकऱ्यांनी ६० ते ७० रुपयांना क्रेटची विक्री केली. दरम्यान, अपेक्षित भाव न मिळाल्याने आणि ग्राहकांअभावी मिळेल त्या भावात फुलांची विक्री करून माघारी परतावे लागले. (प्रतिनिधी)