थंडीच्या वाढत्या प्रभावाने सुकामेव्याचा बाजार बहरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:35+5:302020-12-06T04:15:35+5:30
नाशिक : वाढत्या थंडीत मेथीचे लाडू, खारीक-खोबऱ्याचे लाडू, डिंकाचे लाडू अशा पौष्टिक खुराकासाठी सुकामेव्याच्या खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेतील सुकामेवा विक्रेत्यांकडे ...
नाशिक : वाढत्या थंडीत मेथीचे लाडू, खारीक-खोबऱ्याचे लाडू, डिंकाचे लाडू अशा पौष्टिक खुराकासाठी सुकामेव्याच्या खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेतील सुकामेवा विक्रेत्यांकडे महिलांची गर्दी वाढू लागली आहे.
यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुकामेवा महागला असला तरी कोरोनाच्या काळात तंदुरुस्तीला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने सुकामेव्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. स्मरणशक्ती तल्लख रहावी म्हणून सकाळी सकाळी बदाम खाणार्यांची संख्या मोठी आहे. अनेक घरांमध्ये रात्रभर भिजवून ठेवलेले बदाम, सुकामेवा खायला देतात. कोरोनाचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या उद्देशाने सुकामेव्याचा खप आधीच वाढलेला होता. त्यानंतर सणासुदीच्या काळात काजू आणि बदामचे दर वाढत असतानाही खप सुरूच होता. त्यामुळे सुकामेव्याच्या मागणीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. देशाच्या बाजारात बदामाची आवक अमेरिका व इराणमधून होत आहे. बदामला चीनमधून मोठी मागणी असते. मात्र, सध्या दोन्ही देशांतून चीनला निर्यात बंद आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा बदामाचा हंगाम हा नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात असतो. तसेच भारतात निर्यात वाढली आहे. त्यामुळे आयात निर्यातीच्या बदलत्या समीकरणांमुळे दरात काहीशी घट आली आहे. दरम्यान, गोवा, केरळ, तसेच मंगळुरू येथून काजूची आवक होत आहे. बेदाण्याची आवक नाशिक जिल्ह्यासह सांगलीतून होत आहे. इराण आणि अमेरिकेतून पिस्त्याची आवक होते. काश्मीरमधून अक्रोडची आवक होत आहे. तसेच भारतात यंदा अक्रोडचे उत्पन्न कमी झाल्याने चिली आणि कॅलिफोर्निया या देशांतूनदेखील अक्रोड आयात होत आहे .
इन्फो
सध्याचे सुकामेव्याचे किरकोळ दर (प्रतिकिलो)
बदाम -६५०, काजू ८५०, तुकडा काजू ५००, खजूर १५०, साधी खारीक २५०, काळी खारीक ३००, खोबरे २०० ,बेदाणा २८०, अक्रोड १२५०, अंजीर १०५०, पिस्ता १२५०, खसखस १५००, जर्दाळू ६५०, चारोळी १२५०, गोडांबी ७५०
इन्फो
बदामाचे दर कमी
गतवर्षीच्या तुलनेत बदामाचे दर यंदा शंभर रुपयांनी कमी आहेत, तर काजूचे दर स्थिर आहेत. बाजारात सर्व प्रकारच्या सुकामेव्याला चांगली मागणी आहे.
बाबूभाई पटेल, वाराही ट्रेडिंग