शहरात विविध वस्तुंची दालने खुली झाल्याने बाजारपेठ पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 04:04 PM2020-06-08T16:04:40+5:302020-06-08T16:13:08+5:30
नाशिक शहरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेसह विस्तारीत नाशिकमधील अन्य बाजारपेठादेखील नव्या उमेदीने खुलल्या आहेत. विविध प्रकारची दुकाने उघडण्यास शासनाने अधिकृतरीत्या सोमवारपासून परवानगी दिली असली तरी त्यापूर्वीच शनिवारी आणि रविवारीही शहरात बहुतांश दुकाने उघडली होती. त्यामुळे गत आठवड्यातील अखेरच्या दोन्ही दिवसांमध्ये नाशिकच्या मुख्य रस्त्यांनी पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला .
नाशिक : शहरात तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारपासून अधिकृतरीत्या लॉकडाऊन उठल्याने खऱ्या अर्थाने सर्व बाजारपेठांमधील दुकाने खुली झाली असून ग्राहक पुन्हा पूर्वीसारखेच प्रतिसाद देतील, या विश्वासावर शहरातील विविध वस्तुंची दालने सुरू झाली आहेत. दरम्यान, बाजारपेठेत नागरिकांची गर्दीही असली तरी अजूनही बहूतांश ग्राहकांकडून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीलाच प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेसह विस्तारीत धील अन्य बाजारपेठादेखील नव्या उमेदीने खुलल्या आहेत. विविध प्रकारची दुकाने उघडण्यास शासनाने अधिकृतरीत्या सोमवारपासून परवानगी दिली असली तरी त्यापूर्वीच शनिवारी आणि रविवारीही शहरात बहुतांश दुकाने उघडली होती. त्यामुळे गत आठवड्यातील अखेरच्या दोन्ही दिवसांमध्ये नाशिकच्या मुख्य रस्त्यांनी पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला असून प्रदीर्घ कालावधीनंतर नियमित खरेदीसाठी नागरिक दुकानांमध्ये आल्याने दुकानदार, मालकांनीदेखील ग्राहकांची आपुलकीने चौकशी करीत त्यांच्याशी सुसंवाद साधत मालाची विक्री करीत होते. दालनात पुन्हा ग्राहक परतू लागल्याने दुकानांमधील विक्री प्रतिनिधीदेखील त्यांचे सारे कौशल्य पणाला लावून ग्राहकांना मालाची विक्री करीत आहेत. सर्व प्रमुख दुकाने, दालने पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते हे दुचाकी, चारचाकी वाहनांनी ओसंडून वाहत होते. दरम्यान, पावसाळ्याला प्रारंभ होत असतानाच अधिकृतरीत्या दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने दुकानदारांनीदेखील सोमवारी लवकरच दालने खुली केली.