पशुधन विक्रीसाठी बाजारात
By admin | Published: May 30, 2016 10:27 PM2016-05-30T22:27:26+5:302016-05-31T00:04:21+5:30
दुष्काळाचा परिणाम : कांदा पिकासह द्राक्ष, डाळींबबागा करपल्या
पाटोदा : यावर्षी पडलेल्या भीषण दुष्काळाचे गंभीर परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. चारा व पाण्याअभावी शेतोपयोगी व दुभती जनावरे पोसणे अवघड झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा-राजाची जोडी कवडीमोल भावात विक्री केल्याने आता ऐन खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना अडचण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे टॅक्टरच्या साहाय्याने करून घ्यावी लागत आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे असे शेतकरी आपली शेती मशागत बैलांच्या साहाय्याने करीत आहे. सध्या शेतकऱ्यांकडे भांडवल नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टॅक्टरमालकाला डिझेलपुरते पैसे देऊन तर काहींनी उधार, उसनवारी करून पेरणीपूर्व मशागतीची कामे करून घेतली आहेत. असे असले तरी बी बियाणे व खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना छुप्या सावकारांचा आधार घ्यावा लागणार आहे. हे खासगी सावकारही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक करीत आहेत. अनेक खते बियाणे विक्रे ते शेतकऱ्यांना उधारीवर अव्वाच्या सव्वा भावात बियाणे, खते, औषधे विकत असल्याने व वसुलीसाठी तगादा व धाकदडपशा दाखवीत असल्याने शेतकरी कचाट्यात सापडला आहे.
(वार्ताहर)