निष्ठांचा बाजार उठला, संधीच्या शोधात निघाले सारे!
By किरण अग्रवाल | Published: August 18, 2019 01:16 AM2019-08-18T01:16:10+5:302019-08-18T01:22:23+5:30
सध्याच्या बाजारू राजकारणात निष्ठा वगैरे काही शिल्लक राहिलेली नाही. ज्याला जेथे संधी मिळेल तेथे त्याने ती मिळवावी असे सर्रास सुरू आहे. भाजपत आणि शिवसेनेत आता विधानसभेसाठी भरती सुरू आहे, त्यातून कोणाला किती संधी मिळेल हा भाग वेगळा असला तरी अशा बेगडी नेत्यांचा मतदारांनीच विचार करण्याची गरज आहे.
सारांश
प्रश्न नवीन काही मिळविण्याचा असो की, आहे ते टिकवून ठेवण्याचा; राजकारणात हल्ली फार काळ कोणी संधीची प्रतीक्षा करू इच्छित नाही. जिल्ह्यातील धनराज महाले यांची घरवापसी आणि पारंपरिकपणे कॉँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाºया कुटुंबातील निर्मला गावित यांच्याबाबतही पक्ष बदलाच्या चर्चेकडे याच संदर्भाने पाहता येणारे आहे. राजकीय निष्ठांचा बाजार कधीचाच उठून गेला, आता उरलाय तो संधिसाधूंचा मेळा हेच यातून लक्षात घ्यायचे.
लोकशाहीत निवडणुका जितक्या अपरिहार्य तितकेच जणू आता पक्षांतरेदेखील अपरिहार्य ठरू लागली आहेत. सोयीचा हा कल वरिष्ठ पातळीवरून कनिष्ठ पातळीपर्यंत झिरपत असल्याने श्रेष्ठी तरी त्यास अटकाव कसे करणार? जिल्ह्यातील ताज्या घडामोडी तर मग त्यापुढे खूपच किरकोळ वाटतात. त्यामुळे मनसेचे राहुल ढिकले, काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित आदी पक्ष सोडणार असतील आणि राष्टÑवादीचे धनराज महाले यांनी शिवबंधन घातले असेल तर त्यात फार वैषम्य वाटण्याचे कारण नाही. तथापि, काहींच्या बाबतीत तरी हे खूपच विसंगतीपूर्ण दिसते. ज्या हरिभाऊ महाले यांनी आयुष्य ‘निधर्मी’ पक्षात काढले, त्यांचे चिरंजीव धनराज महाले आधी शिवसेनेत होते. या पक्षाकडून ते आमदार झाले; परंतु खासदारकीचे स्वप्न पडू लागल्यानंतर त्यांनी राष्टÑवादीला गाठले. डॉ. भारती पवार यांनी प्रचार सुरू केला असतानाही त्यांना डावलत त्या पक्षानेही महाले यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली; परंतु सहा महिने होत नाही तोच हे महाले आता पुन्हा स्वगृही परतले आहेत. यात संधीसाठी न थांबण्याची मानसिकता तर आहेच, पण पित्याचा वैचारिक, सैद्धांतिक वारसा ठोकरून लावण्याचे धाडसही दिसावे.
जी बाब महाले यांची तीच निर्मला गावितांबाबतही स्तिमित करणारी ठरावी. तब्बल नऊ वेळा कॉँग्रेसच्या उमेदवारीवर खासदारकी भूषविणाºया माणिकराव गावित यांच्या त्या कन्या. नाशिकमध्ये तर तसा त्यांचा संबंध नसताना दोनवेळा नगरसेवक तर झाल्याच; परंतु इगतपुरी हा आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ असल्याने तेथून उमेदवारी करीत त्या दोनवेळा तेथूनही निवडून आल्या. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला असे म्हणता येऊ नये. तरीही केवळ वाºयाची दिशा बघून त्या तिकडे जाण्याच्या चर्चा होत आहेत. अर्थात आत्तापर्यंत तेथे त्यांच्याविरोधात संघर्ष करीत असलेले स्थानिक शिवसैनिक त्यांना मनाने स्वीकारतील काय हा प्रश्नच आहे, पण हल्ली स्थानिकांचा विचार
करतो कोण? असा ‘रोकडा’ सवाल सर्वांच्या मनात आहे.
आता राहिला प्रश्न राहुल ढिकले यांचा ! ढिकले यांनी रेल्वे इंजिनमधून उडी मारून ‘कमळ’ हाती घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी अद्याप भाजपत प्रवेश केला नसला तरी त्यांच्या पोस्टर आणि बॅनरमधून त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडल्याचे दिसत आहे. अर्थात, राहुल ढिकले यांंच्या पक्षांतराविषयी चर्चा करायचे कारण नाही. त्याचे बाळकडू त्यांना घरातच लाभले आहे. त्यांचे पिताश्री (कै.) उत्तमराव ढिकले यांनी विविध पक्षांत यशस्वी मुशाफिरी केली. मतदारांनी त्यांना साथ देताना कधी पक्षही बघितला नाही. त्यामुळे युतीच्या मदतीने अपक्ष महापौर, शिवसेनेच्या जोरावर खासदार आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या माध्यमातून आमदारकीदेखील भूषविली; परंतु राहुल यांचे तसेच होईल असे सांगता येत नाही. राहुल ढिकले हे मनसेच्या नाशिकच्या राजकारणात आघाडीच्या फळीतील नेते आहेत. त्यांनीच असा पळपुटेपणा केला तर मनसेच्या उरल्या सुरल्या कार्यकर्त्यांनी कोणाची अपेक्षा करायची?
निवडणूक तर आता तोंडावर आली आहे. इच्छुकांना निवडणूक लढविण्यासाठी बºयापैकी अंदाज आला आहे. माणिकराव कोकाटे, रामदास चारोस्कर किंवा तत्सम अनेकांच्या पक्ष बदलाच्या चर्चा झडत आहेत. अनेक चर्चा खºया होतीलही. कॉँग्रेसमध्ये राधाकृष्ण विखेंसारखे राज्यस्तरीय नेतेच जेव्हा पक्ष बदल करताना दिसून आले, तेव्हा स्थानिकांविषयी काय आश्चर्य वाटून घ्यायचे? परंतु मतदारांचे काय? कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन किंवा त्यांचा कल घेतल्याच्या नावाखाली पक्षांतर करणारे मतदारांना चक्क गृहीत धरतात. आपण कितीही व कुठेही कोलांट उड्या मारल्या तरी मतदार जणू आपल्या खिशात आहे, अशीच त्यांची धारणा असते. तेव्हा ही धारणा योग्य की अयोग्य ते मतदारच ठरवतील, फक्त त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.