पोळ्यासाठी बाजारपेठ सज्ज
By Admin | Published: September 11, 2015 10:48 PM2015-09-11T22:48:59+5:302015-09-11T22:51:57+5:30
सावट : जिल्ह्यात दुष्काळ व महागाईमुळे निरुत्साह
नाशिक : जिल्ह्यातील उमराणे, दिंडोरी,पिळकोस ,वडाळीभोई येथील बाजारपेठ पोळा सणासाठी सज्ज झाली आहे. बळीराजा बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीत व्यस्त असल्याचे चित्र आहे.
उमराणे : शेतकऱ्यांचा आवडता सण पोळा येऊन ठेपला असून, त्यासाठी दर शनिवारी भरणारा येथील आठवडे बाजार ‘सर्जा-राजाला’ सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंनी सजला आहे. दुष्काळसदृश परिस्थिती पाहता बाजारपेठेत उत्साह दिसून येत नसला तरी येत्या बाजारपेठेत उलाढाल वाढेल, असा विक्रेत्यांना विश्वास आहे.
वर्षभर शेतात राबणाऱ्या, ज्याच्या मदतीने शेतीची कामे पूर्ण केली जातात अशा आपल्या लाडक्या सर्जा -राजा बैलांसाठी शेतकरी बांधवांना पोळा सणाचे वेध लागले असून, काही वर्षांपासून वरुणराजाच्या अवकृपेने या सणावर विरजन पडत आहे. परिणामी पोळा सणाबाबत असलेला उत्साह दरवर्षी कमी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यंदा तर जून महिन्याच्या प्रारंभीच्या पावसानंतर तीन महिने उलटत आले तरी पाऊस नसल्याने दुष्काळसद्ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीतही काहींनी ऋण काढून सण साजरा करण्यासाठी तयारी चालवली आहे.
सणानिमित्त बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची बाजारात गर्दी झाली आहे. त्यात गोंडे, नाथ, पैंजण, शिंगासाठी शेंदुरी, कलर, रेबीन, चाळ, पट्टा आदि विविध वस्तूंचा समावेश आहे. वाढत्या महागाईमुळे या वस्तूंच्या किमतीदेखील गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे एका बैलजोडीसाठी किमान हजार ते दीड हजार रुपये वस्तूंची खरेदी करावी लागणार आहे. सद्यस्थितीत बहुतांश शेतकरी आर्थिक परिस्थिती नसतानाही आपल्या जिवाभावाच्या सर्जा-राजासाठी वस्तू खरेदी करतील, असा विश्वास विक्रेत्यांना वाटत आहे.
दिंडोरी : पोळा सण आल्याने दुकाने दरवर्षाप्रमाणे सजली असून, दुष्काळजन्य परिस्थितीच्या झळा बसत असल्याने बळीराजा आपल्या लाडक्या सर्जा-राजासाठी हात आखडूनच खरेदी करत असल्याचे चित्र आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी, वणी, खेडगाव येथील बाजारपेठा दरवर्षाप्रमाणे कासरा, शिंग गोंडे, केसारी, मणी माळा, पितळी चैन, झुली, चंगाळे, मोरक्या, वेसनी, गुघरं, पैंजन, बाशिंग, कवडीमाळ, तिरंगा माळ, छमडी गोंडा आदि शोभेच्या साहित्याने सजल्या आहेत.
तालुक्यात समाधान कारक पाऊस नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. यामुळे बळीराजाच्या हाती पुरेसा पैसादेखील नाही. यामुळे सर्जा-राजाला सजवण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करताना काही प्रमाणात हात आखडून खरेदी केली जात आहे.
वडाळीभोई : चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथ बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर रंगबिरंगी साहित्याने सजला असून, दोन दिवस थोड्या प्रमाणात का होईना पाऊस झाल्याने बळीराजाच्या आशा उंचावल्या आहेत. परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वरुणराजाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग चिंतातुर झाला होता. मात्र थोड्या प्रमाणात झालेल्या पावसाने बळीराजा काहीसा सुखावला आहे. बैल पोळा सण शेतकऱ्यांचा साथीदार बैलांचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आज गुरुवारी वडाळीभोई येथील बाजारात बैलांना सजविण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणावर विक्रीस आले होते. मात्र वाढती महागाई, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरीवर्ग आखडता हात घेऊन आपल्या बैलराजांला सजविण्यासाठी साहित्य खरेदी करताना दिसत असला तरी पुढे पाऊस न झाल्यास तालुक्यात दुष्काळी परिस्थिती ओढवेल या भीतीपोटी शेतकरीवर्ग हात राखूनच खरेदी करताना दिसत होता
पिळकोस : कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांवर पावसाअभावी ओढावलेली दुष्काळी स्थितीचे सावट पोळा सणावरही पाहायला मिळते आहे. बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने फुलल्या असल्या तरी शेतकरीवर्गाने मात्र खरेदीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी छोट्या व्यावसायिकांनी गावात जाऊन साहित्य विक्री केली.
पिळकोस, भादवण, विसापूर, बेज, बिजोरे, चाचेर, गांगवन, बगडू परिसरात यंदा अद्यापही पाऊस झालेला नसल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. दुथडी भरून वाहणारी गिरणा नदीही यंदा कोरडीपडल्यामुळे बैलसुद्धा हौदात किंवा टाकीजवळ धुवावे लागणार आहेत. दुष्काळी स्थितीमुळेच पोळ्याचा उत्साह येथे कमी झालेला दिसतो आहे. बाजारपेठा सज्ज असल्या तरी साहित्य खरेदीसाठी शेतकरीवर्ग फिरकला नाही. त्यामुळे व्यावसायिकांनी गावात दारोदारी जाऊन सजावटीचे गोंडे, माथोड्या, नाथा असे विविध साहित्य विक्री केले. वाढत्या महागाईचा परिणाम त्याच्या किमतीवरही झालेला आहे.(लोकमत चमू)