लाल कांद्याच्याही बाजारभावाला लाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 05:28 PM2019-12-03T17:28:28+5:302019-12-03T17:28:41+5:30
उन्हाळ कांद्याची आवक मंदावली : आयातीमुळे परिणामांची भीती
लासलगाव : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक बंद झाली असून मंगळवारी (दि.३) २५१ वाहनातील २६७४ क्विंटल लाल कांदा किमान २५०० ते कमाल ८९०१ रूपये आणि सरासरी ७१०० रूपये दराने विक्री झाला. केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्की या दोन देशांतून १७ हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला असला तरी उन्हाळ कांद्या पाठोपाठ लाल कांद्याच्या बाजार भावालाही लाली चढली आहे. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजार भावाने आठ हजाराचा टप्पा पार करत उच्चांक केला.
देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्की या दोन देशातून १७ हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा डिसेंबरच्या शेवटी तसेच जानेवारीच्या सुरु वातीस देशांतर्गत दाखल होणार आहे. त्यादरम्यान लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात देशांतर्गत आवक होणार असल्याने दोन्ही कांदे एकाच वेळी बाजारात दाखल झाल्यास कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळतील. परिणामी त्याचा फटका भारतीय कांदा उत्पादकांना बसण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी व्यक्त केली आहे.