शहर परिसरात बाजारपेठेतील रस्ते मोकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:13 AM2021-03-22T04:13:56+5:302021-03-22T04:13:56+5:30
नाशिक: जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाच्या दुसऱ्या आठवड्यात रविवारच्या दिवशी बाजारपेठेतील रस्ते मोकळे दिसत होते. प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने बंद ...
नाशिक: जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाच्या दुसऱ्या आठवड्यात रविवारच्या दिवशी बाजारपेठेतील रस्ते मोकळे दिसत होते. प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने बंद असल्याने बाजारात शांतता पसरली होती तर खाद्यपदार्थांची अनेक दुकाने सुरू असल्याने या दुकानांपुढे ग्राहकांची गर्दीही दिसून आली.
कोरोनाला रोखण्यासाठी आखून दिलेल्या निर्बंधानुसार शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्यानुसार दुसऱ्या आठवड्यातील शनिवारी नाशिककरांनी आपली जबाबदारी ओळख आवाहानाला प्रतिसाद दिला. रविवारीदेखील दुकाने बंद होती मात्र खाद्य पदार्थ, चहा, स्वीट मार्ट, कॅफे, डायनिंग हॉल्स, ज्यूस, बेकरी अशी दुकाने सुरूच असल्याने दुकानांमध्ये तरुण-तरुणींची गर्दी दिसून आली. मास्क, डिस्टन्स तसेच सॅनिटायझेशनबाबतची जागरूकता याबाबतच्या नियमांचे पालन होताना दिसले नाही.
शनिवारी आणि रविवारी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्यानुसार नाशिककरांनी पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसऱ्या आठवड्यातही सामंजस्याची भूमिका घेतली. रस्त्यांवर गर्दी दिसत असली तरी दुपारनंतर शुकशुकाट होता. खाण्यापिण्याच्या स्टॉल्सवर निर्बंध नसल्याने तेथे झालेली गर्दी नियंत्रणात ठेवण्याचे नियोजन संबंधित दुकानमालकांनी केल्याचेही दिसून आले.
प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिककर घरीच थांबत असले तरी दुकानांसमोर होणारी गर्दी देखील प्रशासनाला चिंतेत टाकणारी आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी शहरात अनावश्यक सुरू असलेल्या दुकानदारांवर कारवाई सुरू केली आहे. नाशिकरोड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अनेक हॉटेल्स चालकांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली.