मनपाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी मार्केटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:15 AM2019-05-12T01:15:19+5:302019-05-12T01:16:17+5:30
महापालिकेच्या शाळा म्हटल्या की त्यात भौतिक सुविधा नाही की तंत्रज्ञान नाही, असा समज गेल्या काही वर्षांत खोटा ठरला असून, आयएसओ कोड मिळवणाऱ्या अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागते.
नाशिक : महापालिकेच्या शाळा म्हटल्या की त्यात भौतिक सुविधा नाही की तंत्रज्ञान नाही, असा समज गेल्या काही वर्षांत खोटा ठरला असून, आयएसओ कोड मिळवणाऱ्या अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागते. महापालिकेच्या शाळांचे महत्त्व नागरिकांना कळावे आणि या शाळांकडे कल वाढावा यासाठी काही शिक्षकांनी व्हिडीओ तयार केले असून, ते शाळांकडे कल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
नाशिक महापालिकेच्या ९० शाळा असून सुमारे तीस हजार मुले आहेत. सध्या शासनाच्या धोरणानुसार सर्वच शाळा डिजिटल होत असून, महापालिकेच्या शाळेतदेखील ई लर्निंगच्या माध्यमातून शिकवले जाते. सर्व मुलांना पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके मिळतात. तसेच मुलांना गणवेशाचे दोन जोडदेखील मोफत दिले जातात. अलीकडील काळात शाळांमध्ये नव संकल्पनेच्या आविष्कारणाचे काम केले जाते आणि ज्ञानरचना वादावर आधारित शिक्षण दिले जाते. मुलांसाठी क्रीडा महोत्सव, तसेच विविध छंद जोपासण्याची संधी, रोटरॅक्टसारख्या संस्थांच्या शाखा असे सर्वच केले जात असते. महापालिकेच्या या शाळांच्या जमेच्या बाजू असून पारंपरिक दृष्टिकोन असलेल्या अनेक पालकांना त्या ज्ञात नाहीत. या पार्श्वभूमीवर शाळेतील शिक्षकांना पटसंख्या वाढविण्यासाठी या गोष्टीची माहिती करून द्यावी लागते. तीच माहिती धु्रवनगर येथील महापालिका शाळेतील शिक्षक नामदेव जानकर तसेच आनंदवली येथील महापालिका शाळा क्रमांक १८ मधील शिक्षिका सविता बोरसे यांनी आकर्र्षक व्हिडीओच्या माध्यमातून दिली जात आहे. विविध ग्रुपवर हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांना तर त्या माध्यमातून महापालिकेच्या बदलेल्या शाळांची माहिती होत आहे.
नामदेव जानकर यांनी यापूर्वी निशब्द नामक लघुपट तयार केला होता. तर सविता बोरसे यांची शहरातून युनिस्कोच्या शैक्षणिक प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. या दोघा शिक्षकांनी मोबाइलवर शूटिंग करून तसेच संगणकावरील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे व्हिडीओ तयार केले आहेत. शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे यांनी मार्गदर्शन केले.