रविवारच्या दिवशी बाजारपेठा फुल्ल - शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:57 PM2020-06-07T17:57:28+5:302020-06-07T18:01:15+5:30
शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि रविवार कारंजा येथे दुपारी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. विशेषत: शालेय साहित्यांची खरेदी करण्यासाठी पालक बाहेर पडल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून आले.
नाशिक : लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शनिवापासून बाजारेपेठेतील सर्व दुकाने सुरू झाल्याने बाजारपेठेतील गर्दी वाढू लागली आहे. रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने बाजारपेठेत अधिक गर्दी झाल्याचे दिसून आले. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि रविवार कारंजा येथे दुपारी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. विशेषत: शालेय साहित्यांची खरेदी करण्यासाठी पालक बाहेर पडल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून आले.
शहरातील दुकाने सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बाजारातील सर्वच रस्त्यांवर ग्राहकांची गर्दी दिसून आली. अत्याश्यक सेवेतील दुकाने यापूर्वीच सुरू होती आता आणखी दुकाने सुुरू झाल्याने बाजारपेठदेखील गजबजली आहे. रस्त्यांदर दुकाने थाटणाऱ्यांची संख्या दोन दिवसांत अधिक वाढली आहे. विशेषत: शालेय साहित्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसते. रस्त्यांवरील विक्रेत्यांकडेदेखील बूट, वॉटरबॉटल, कम्पास, टिफीन बॉक्स, टिफीन बॅग्स आदी साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. रविवार कारंजा येथील किराणा व्यापाऱ्यांकडील गर्दी रविवारी वाढल्याने रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली होती. ग्राहक चारचाकी, दुचाकीने खरेदीसाठी आल्यामुळे बाजारपेठेत वाहनांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. मेनरोडलादेखील वाहनांच्या गर्दीमुळे कोंडी अधिकच वाढते. नाशिकरोड येथील बिटको चौक, वॉस्को चौक तसेच स्टेट बॅँक चौकातील बाजारपेठ, मिनारोड येथे गर्दी झाली आहे. सिडको, सातपूर, पंचवटीतही गर्दी वाढल्याचे दिसते.