लग्नसराई, सुट्ट्यांमुळे मतदानाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:52 AM2019-04-19T00:52:15+5:302019-04-19T00:52:33+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तारीख जवळ येत असतानाच लग्नसराई त्याचबरोबर सुट्यांचा काळ सुरू होत असल्याने हक्काचे मतदान कसे करून घ्यावे, अशी चिंता निर्माण झाली आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तारीख जवळ येत असतानाच लग्नसराई त्याचबरोबर सुट्यांचा काळ सुरू होत असल्याने हक्काचे मतदान कसे करून घ्यावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. त्यातच सिडको - सातपूर पट्ट्यातील उत्तर भारतीयदेखील मूळ गावी मतदानासाठी जात असल्याने हीसुद्धा राजकीय पक्षांना अडचणीत आणणारी बाब ठरली आहे.
अटीतटीच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा कस लागला आहे. तसा प्रत्येक पक्षाच्या विचाराला बांधील मतदार वर्ग ठिकठिकाणी असतोच. परंतु मतदान करून घेणे हे फार मोठे आव्हानात्मक काम असते. त्यामुळेच अनेकदा उमेदवारांना मतदारांसाठी गाड्यांची सोय करण्यासारखे अनुचित प्रकारदेखील करावे लागतात. हक्काचे मतदान सुटू नये हा त्यामागचा उद्देश असतो. यंदा ऐन एप्रिल महिन्यात निवडणूक होत असून, अनेक कारणांमुळे हक्काचे मतदान कसे होईल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, मध्यंतरी पाऊस पडला असला तरी तत्पूर्वी तापमान चाळीस अंशांपर्यंत गेले होते. नाशिक शहरातही अशा कडक उन्हाच्या वेळी रहदारीचे रस्ते ओस पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात मतदारांना मतदानासाठी घराबाहेर आणण्यासाठी प्रवृत्त करणे हे मोठे आव्हान ठरले आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा होत असतात. परीक्षा संपल्यानंतर पालक मुलांना घेऊन बाहेर गावी निघून जातात. त्यामुळे हक्काचा मतदार बाहेर गेला तर मतदान करून घेणेदेखील अडचणीचे ठरणार आहे.
सर्वाधिक चिंतेचा विषय लग्न सोहळ्यांचा आहे. पुढील आठवड्यात तसेच २९ एप्रिल रोजी म्हणजे मतदानाच्या दिवशीदेखील लग्नाची तिथी असल्याने अनेक नागरिक त्यात व्यस्त असतील तसेच अन्यत्र लग्न सोहळ्यासाठी गेलेल्यांमुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता असून, ही बाबदेखील अडचणीची ठरणार असून, संबंधिताना मतदानासाठी कसे प्रवृत्त करता येईल हा अडचणीचा भाग ठरला आहे.
उत्तर भारतीयांची मनधरणी
उत्तर भारतातदेखील अनेक टप्प्यात मतदान होत असून, अशावेळी नाशिक शहरातील सिडको-सातपूर भागातील विशेषत: अंबड लिंकरोड, अशोकनगर, शिवाजीनगर, कामगारनगर अशा अनेक भागांत असलेल्या उत्तर भारतीयदेखील मूळ गावी गेले आहेत किंवा जात आहेत तर काही जण शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतरदेखील सुटीत गावी जातात. त्याचादेखील मतदानाला फटका बसण्याची शक्यता असून, अशावेळी त्यांना मतदान झाल्यानंतर गावी जाण्यासाठी कसे प्रवृत्त करता येईल याविषयीदेखील राजकीय पक्षांची चाचपणी सुरू आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस आहे. पुढील आठवड्यात २३ तसेच २६ एप्रिल रोजी लग्नाची तिथी आहे. तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजीदेखील लग्नाची तिथी आहे. त्याचा मतदानाला फटका बसू शकतो. अर्थात, मतदान करणे हे काम प्राधान्याने केले पाहिजे.
- नरेंद्र धारणे गुरुजी, पंचवटी