शॉक बसल्याने विवाहितेचा भाजून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:13 AM2017-12-26T01:13:25+5:302017-12-26T01:14:11+5:30
१३२ केव्ही उच्च दाब वीजवाहिनी-जवळ पाणी पडल्याने त्याचा शॉक बसल्याने कळवण शहरातील २५ वर्षीय विवाहितेचा भाजल्याने मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली.
कळवण : १३२ केव्ही उच्च दाब वीजवाहिनी-जवळ पाणी पडल्याने त्याचा शॉक बसल्याने कळवण शहरातील २५ वर्षीय विवाहितेचा भाजल्याने मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली. गेल्या बुधवारी (२० डिसेंबर) वरवंडी येथील योगेश चव्हाण यांची पत्नी व कळवण येथील माहेरवासीन कोमल योगेश चव्हाण (२५) ही सकाळी घरावरील गच्चीवर कपडे वाळत घातल्यानंतर गच्चीवरून झाडांना पाणी टाकत असताना घराजवळून गेलेल्या १३२ केव्ही उच्च दाबाच्या वीजपुरवठा करणाºया वीज वाहिनीच्या तारावर पाणी पडले त्यामुळे कोमलला शॉक बसला. त्याचबरोब वीज वाहीनीनेही पेट घेऊन रौद्ररूप धारण केले. यात कोमल चव्हाण ७० टक्के भाजली. तिला तत्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार दिवस वैद्यकीय उपचार केल्यानंतर रविवारी कोमल चव्हाण शुध्दीवर आली. कुटुंबातील सदस्यांशी संवादही साधला. मात्र सोमवारी सकाळी १० .३० वाजता या विवाहीतेचा मृत्यू झाला. मयत कोमल चव्हाण ही कळवण येथील सामाजिक कार्यकर्ते व कळवण शहर कॉँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष दिलीप पगार यांची जेष्ठ कन्या होत. वरवंडी येथे दुपारी साडेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तीच्या पश्चात पती , आई , वडील , सासू , सासरे , भाऊ , बहीण असा परिवार आहे.