घराला लागलेल्या आगीत विवाहितेचा भाजून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:00 AM2018-11-15T01:00:17+5:302018-11-15T01:00:41+5:30
गंजमाळजवळील पंचशीलनगर झोपडपट्टीतील एका घरास बुधवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत सुनीता योगेश लाहोटी (३०, रा़ मारवाडी गल्ली, भगूर) या विवाहितेचा भाजून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दिवाळीनिमित्त आत्याला भेटण्यासाठी आलेल्या भाचीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक : गंजमाळजवळील पंचशीलनगर झोपडपट्टीतील एका घरास बुधवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत सुनीता योगेश लाहोटी (३०, रा़ मारवाडी गल्ली, भगूर) या विवाहितेचा भाजून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दिवाळीनिमित्त आत्याला भेटण्यासाठी आलेल्या भाचीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आगीचे कारण आद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंजमाळ परिसरातील पंचशीलनगर झोपडपट्टीत भागूबाई आव्हाड यांचे घर आहे़ लाकडी फळ्या व पत्रे यांच्या साहाय्याने हे घर बनविण्यात आले असून, मंगळवारी रात्री (दि़१३) त्यांची भाची सुनीता लाहोटी ही दिवाळीनिमित्त त्यांना भेटण्यासाठी आली होती़ बुधवारी (दि़१४) दुपारी एक वाजेच्या सुमारास भाची सुनीता ही घरात असल्याने भागूबाई आव्हाड या भाजी आणण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या़ या कालावधीत अचानक त्यांच्या घराला आग लागली़
या आगीमुळे लाकडी फळ्या, घरातील कपड्यांनी पेट घेतल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले व शेजारी असलेल्या लाकडी घरांनीही पेट घेतला़ पंचशीलनगर झोपडपट्टीतील आव्हाड यांच्या घरातून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने चौकात उभे असलेले छोटू भालेराव, कुणाल पवार, जावेद खान यांनी घराकडे धाव घेतली़
शेजारच्या घरांतील हजारोंचे साहित्य जळाले
भागूबाई आव्हाड यांच्या घराला लागूनच रत्ना मोरे, प्रकाश जाधव, रेणुका नेमाने, सुनील पालवे यांची घरे असून, त्यासाठी लाकडाचा अधिक वापर करण्यात आलेला आहे़ आव्हाड यांच्या घराला लागलेली आग शेजारच्या घरांनाही लागल्याने त्यामध्ये घरातील डबे, कपडे, टीव्ही आदी हजारो रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत़ यामुळे महापालिकेकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा या नागरिकांनी व्यक्त केली आहे़
अकरा महिन्यांपूर्वीच विवाह
सुमारे अकरा महिन्यांपूर्वीच सुनीता यांचा विवाह योगेश लाहोटी यांच्यासोबत झाला होता़ तर त्यांच्या सासूबार्इंचे अकरा दिवसांपूर्वीच निधन झाले आहे़ घरातील मंडळी सासूच्या उत्तरकार्याची तयारी करीत होती़ तर दिवाळीनिमित्त सुनीता लाहोटी या मंगळवारी रात्री आत्या भागूबाई आव्हाड यांना भेटण्यासाठी पंचशीलनगरमध्ये आली होती़ मात्र, दुसऱ्या दिवशी घराला आग लागली व त्यामध्ये सुनीता लाहोटी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला़