विवाहितेला माहेरी घेण्यास गेलेल्या मंडळींना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:39 AM2018-05-31T00:39:57+5:302018-05-31T00:39:57+5:30
लग्नात वाद-विवाद झाल्यानंतर विवाहितेला माहेरी पहिल्या मुळासाठी घेण्यास गेलेल्या सासू, नणंद व दिराला मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी माहेरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : लग्नात वाद-विवाद झाल्यानंतर विवाहितेला माहेरी पहिल्या मुळासाठी घेण्यास गेलेल्या सासू, नणंद व दिराला मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी माहेरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॅमरोड जमाल सॅनेटोरियम येथे राहणारी रूपाली सुरेश उन्हवणे हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या १३ मे रोजी भाऊ बादल सुरेश उन्हवणे याचा विवाह शुभांगी साहेबराव निकम हिच्याशी झाला. लग्न समारंभात फोटो काढण्यावरून मुलीचे मामा अशोक बागुल यांनी वाद घातल्याने त्यांचा भाऊ व मुलाने नवरदेव बादल याचा लहान भाऊ आकाश याचा गळा दाबला होता. वाद-विवादानंतर दोन्ही कुटुंबातील नातेवाईक समझोता करून घेण्यासाठी बसले होते. प्रारंभी विवाहिता शुभांगी हिला लग्नानंतर ते सासरी पाठविण्यास तयारच नव्हते. तिच्या मावशीसोबत शुभांगीला पाठविल्यानंतर ती पहिल्या मुळाला माहेरी गेली होती. १६ मे रोजी विवाहिता शुभांगी हिला घेण्यासाठी सासू, नणंद- रूपाली, ज्योती, दीर- आकाश हे गेले असता अशोक बागुल, त्यांचा मुलगा, भाऊ व शरद बागुल यांनी सासरच्या लोकांना मारहाण व शिवीगाळ केली. यामध्ये नणंदेशी अश्लील वर्तन करून लज्जा उत्पन्न होईल अस कृत्य केले. या मारहाणीत रूपाली हिच्या गळ्यातील चेन व कानातील सोन्याची रिंग कुठेतरी पडून गहाळ झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.