‘आई मला माफ कर...’ असे लिहून विवाहितेने चौथ्या मजल्यावरून घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 01:22 AM2022-01-03T01:22:27+5:302022-01-03T01:22:45+5:30
आई मला माफ कर, माझ्या मरणास कोणालाही दोषी धरू नये, अशी मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून सिडकोतील खुटवडनगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेने राहत्या घराच्या इमारतीवरून उडी घेत आपला जीवनप्रवास संपवला. रविवारी (दि.२) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला. प्रियंका आकाश पगार (२४) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे.
सिडको : आई मला माफ कर, माझ्या मरणास कोणालाही दोषी धरू नये, अशी मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून सिडकोतील खुटवडनगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेने राहत्या घराच्या इमारतीवरून उडी घेत आपला जीवनप्रवास संपवला. रविवारी (दि.२) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला. प्रियंका आकाश पगार (२४) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे.
मूळ निफाड तालुक्यातील सावळी गावाच्या रहिवासी असलेल्या प्रियंकाचा विवाह गेल्यावर्षी जुलैमध्ये कोपरगाव येथील रहिवासी आकाश तानाजी पगार यांच्याबरोबर थाटामाटात संपन्न झाला. यानंतर प्रियंका या पती आकाश पगारे व सासू-सासरे असे एकत्र कुटुंब सिडको, खुटवडनगर येथील कृष्णा प्राइड या इमारतीत राहत होते.
रविवारी सकाळी प्रियंकाचे पती आकाश पगारे हे कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. तसेच सासू-सासरेही नातेवाइकांकडे गेले असताना प्रियंका एकटीच घरी होती. यादरम्यान सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन टेरेसवरून उडी घेतली. काहीवेळातच परिसरात ही माहिती कळाली. प्रियंकाला जखमी अवस्थेत तेजस मोहिते यांनी जिल्हा रुग्णालयात तत्काळ हलविले; मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. विवाह होऊन अवघे सहा महिने होत नाही तोच प्रियंकाने आपले जीवन संपविल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेने खुटवडनगर रविवारी हादरून गेले. दिवसभर परिसरात याबाबत चर्चा सुरू होती व रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती.
--इन्फो--
पोलिसांना आढळली ‘सुसाइड नोट’
पंचनाम्यादरम्यान प्रियंकाकडे पाेलिसांना सुसाइड नोट आढळून आली. यमध्ये ‘आई मला माफ कर; माझ्या मरणास कोणालाही कारणीभूत ठरवू नये. थोडे दिवस तुम्हाला त्रास होईल...’ असा मजकूर लिहिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्रियंकाने अचानकपणे इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास आता अंबड पोलिसांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.