शहीद नितीन भालेराव यांचे पार्थिव नाशकात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:07 PM2020-11-29T16:07:01+5:302020-11-29T16:12:15+5:30
नक्षलीविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला.
नाशिक : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील ताडमेटलाच्या जंगलात शोधमोहिमेवर निघालेल्या सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो बटालियनच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी धोक्याने भुसुरुंग स्फोट घडवून आणला. यामुळे तुकडीचे असिस्टंट कमान्डंट व नाशिकचे भुमीपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण आले आणि दहा कोब्रा कमांडो जखमी झाले. त्यापैकी तीघे गंभीररित्या जखमी आहेत. रविवारी (दि.२९) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले.
नक्षलीविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. भालेराव हे कोब्रा बटालयिन-२०६मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. भालेराव हे मूळ निफाड तालुक्यातील देवपूर येथील रहिवासी आहेत. सध्या ते नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्यास होते. सुकमा जिल्ह्यातील ताडमेटला भागात कोब्रा बटालियन गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी शनिवारी (दि.२८) रात्री स्फोट घडवून आणला. या स्फोटात भालेराव यांच्यासह इतर दहा कमांडोदेखील जखमी झाले आहेत. जखमींना हेलिकॉप्टरने रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र पहाटे साडेतीन वाजता भालेराव त्यांची उपचारापुर्वीच प्राणज्योत मालवली.
२००८ मध्ये सैन्यात दाखल झालेले भालेराव हे २०१० पासून कोबरा बटालियनमध्ये सहायक कमांडंट पदावर कार्यरत होते. कोबरा बटालियन-२०६ जे अधिकारी असलेले भालेराव हे जवानांसोबत अभियानावरून परतत असताना नक्षली हल्ला झाला. रात्रीच्या सुमारास परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी माओवाद्यांच्या ॲम्बुशमध्ये जवान अडकले यावेळी हा स्फोट घडवून आणला गेला. पिपल गुरील्ला आर्मी मोहीम दोन डिसेंबरपासून सुरू होणारा आहे. या पार्श्वभूमीवर माअोवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याची बोलले जात आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भालेराव यांना श्रद्धांजली अर्पण केली
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वीरजवान नितीन भालेराव यांना श्रद्धांजली अर्पण केली. माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाने भारतमातेने वीर सुपुत्र गमावला अशा शब्दात त्यांनी शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. तसेच खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हीरे यांनी राजीवनगर येथे भालेराव कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.