शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही मास्क सक्तीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:21 AM2021-02-26T04:21:27+5:302021-02-26T04:21:27+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी आपात्कालीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशावरून शहरात रात्रीची संचारबंदी लागू ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी आपात्कालीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशावरून शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर जिल्ह्यात मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. शहरात याबाबतची अंमलबजावणी सुरू झाली असताना आता ग्रामीण भागातही विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विनामास्क आढळणाऱ्यांवर हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार असून, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तसेच गटविकास अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे, सर्व आस्थापना, सभा, समारंभ तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी जमणाऱ्या नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे; मात्र मास्कचा वापर केला जात नसेल तर अशा व्यक्तींकडून हजार रुपयांचा दंड करण्याची कारवाई करावी, असे आदेश जिल्हधिकाऱ्यांनी काढले आहेत. कारवाई केल्यानंतर दंडाच्या रकमेचा हिशेबदेखील तहसील कार्यालयाने ठेवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
साथरोग कायद्याच्या अधिनियमानुसार जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याबाबतचे आदेश शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात होणाऱ्या लग्न सोहळ्यांची गर्दी लक्षात घेता लॉन्स आणि मंगल कार्यालयांवर अधिक लक्ष केंद्रित केेले जाणार आहे. तहसील कार्यालयाकडून याबाबतची माहिती मंगल कार्यालये, लॉन्स संचालकांना देण्यात आलेली आहे. गर्दी झाल्यास अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची कल्पनादेखील दिली जात आहे.