मास्क हैं जरुरी, इसे समजो ना मजबुरी; २० हजार नाशिककरांनी दिला मास्क वापराला फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:28 PM2020-12-07T16:28:58+5:302020-12-07T16:36:07+5:30
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी विशेषत: सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क अवश्य लावावा आणि 'सोशल डिस्टन्स'बाबत सतर्क रहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात येत असला तरीदेखील किमान तापमान आता वेगाने घसरु लागले असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविली जात असताना दुसरीकडे नाशिककरांनी कोरोनापासून बचावासाठी सांगितलेल्या उपाययोजना व घ्यावयाच्या काळजीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर अनिवार्य असतानाही मास्क न वापरणे पसंत करणाऱ्या २० हजार बेफिकिर नाशिककरांवर आतापर्यंत पोलिसांनी कारवाई केली आहे.
कोरोनापासून बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मास्क न वापरो, सामाजिक अंतर पाळवयाच्या नियमांचे उल्लंघन करणे, सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे थुंकताना आढळून आल्यास पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहे. शहरात आतापर्यंत तब्बल २० हजार लोक मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणी न करताना पोलिसांना आढळले.
कोरोनाचा सामना करण्यासाठी सध्या 'मास्क हेच औषध' असे सरकारकडून तसेच प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे; मात्र मास्क वापराबाबत नागरिकांमधये लॉकडाऊन शिथिलतेनंतर वेगाने उदासिनता वाढू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहर व परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळूनच येत नाही, असे अजिबात नाही. यामुळे कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे कानाडोळा करणे 'महाग' पडू शकते, त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी विशेषत: सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क अवश्य लावावा आणि 'सोशल डिस्टन्स'बाबत सतर्क रहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे.