उद्या नाशकातील शैक्षणिक संस्थांना सुटी, गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:37 PM2019-08-04T13:37:46+5:302019-08-04T13:39:50+5:30
नाशिक - शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून त्यातच गोदावरी , नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी अशा सर्वच नद्यांना ...
नाशिक- शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून त्यातच गोदावरी, नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी अशा सर्वच नद्यांना पुर आला आहे. त्यातच वेधशाळेने चोवीस तास पावसाचा इशारा दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा- महाविद्यालयांना सुटी घोषीत केली आहे. तर उत्साही पुर पर्यटकांना आवरण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
दोन दिवसांपासून पावसाचा कहर सुरू असून आज तर सर्वच नद्या नाल्यांना पुर आल्याने अनेक भागातील पुल आणि रस्ते बंद झाले आहे शहरातील रस्त्यांवर देखील अक्षर: पाट वाहात आहेत. शहराजील जनजीवन विस्कळीत झाले असून पावसामुळे बाजारपेठा देखील बंद आहेत. वेधशाळेने रात्रीपर्यत मध्यम आणि जोरदार सरींची शक्यता वर्तवला आहे. त्यामुळे दक्षतेचा भाग म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी शिक्षण संस्थांना सुटी जाहिर केली आहे.
सकाळपासून पावसाचा जोर रात्रीप्रमाणेच कायम असून रविवारी (दि. ४) सुटी असल्याने पुर पहाण्यासाठी वेगवेगळ्या भागात गर्दी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व पुल आणि बंद झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाढती गर्दी टाळण्यासाठी पोलीसांनी कलम १४४ अन्वये जमावबंदी केली आहे. पुर पहाण्यासाठी गर्दी करू नये किंबहूना पावसामुळे घराबाहेरच निघू नये असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.