दरोड्याचे प्रत्यक्षदर्शी संपविण्यासाठी हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:39+5:302021-04-07T04:15:39+5:30
दरोडे टाकून मौल्यवान वस्तू, दागिने चोरी करून आपली गुजराण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या तीन जिल्ह्यांत ...
दरोडे टाकून मौल्यवान वस्तू, दागिने चोरी करून आपली गुजराण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर या तीन जिल्ह्यांत प्रामुख्याने सक्रिय होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याच टोळीतील काही दरोडेखोरांनी वाखारी येथील शेतातील एकाकी घर बघून तेथे दरोडा टाकला होता. यावेळी हल्लेखोरांना बाहेर ओट्यावर झोपलेल्या कुटुंबातील काही सदस्यांनी बघितले असता त्यांनी दरोड्याच्या प्रत्यक्षदर्शींना संपविण्याच्या इराद्याने कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने निर्घृणपणे चौघांची हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सर्वप्रथम महामार्गावरील ओझरजवळील दहावा मैल परिसरात सापळा रचला. तेथे संशयित संकेत ऊर्फ संदीप महेंद्र चव्हाण (रा. भूषणनगर, केडगाव, जि. अहमदनगर) यास पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने काहीही कमधंदा करण्याची सवय नसल्याने व चैनीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने रात्रीच्या वेळी एकाकी भागातील घरांवर दरोडा टाकून लूट करण्याचा मार्ग अवलंबविला होता, अशी कबुली दिली. पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीवरून गुन्ह्याचा पारंपरिक व तांत्रिक पद्धतीने तपास करत त्याचे दोन साथीदार सचिन ऊर्फ बोंग्या ऊर्फ पवन ऊर्फ रवी ऊर्फ धर्मा सखाहरी चव्हाण, रा. पढेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) आणि सचिन विरुपण भोसले (रा. शिरोडी, ता. वाळुंज, जि. औरंगाबाद) यांनाही अटक केली. या तिघांनी मिळून वाखारी येथील समाधान अण्णा चव्हाण यांच्या घरावर हल्ला करत त्यांच्यासह पत्नी भारती, मुलगी आराध्या आणि मुलगा अनिरुद्ध यांच्या मानेवर, डोक्यावर व हातांवर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने वार करत ठार मारल्याची कबुली दिली.
--इन्फो--
सराईत गुन्हेगारांची टोळी
कामधंदा न करता केवळ दरोडे, जबरी लूट, चोऱ्या करून गुजराण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी उत्तर महाराष्ट्रात सक्रिय असल्याचे या गुन्ह्याच्या तपासात पुढे आले आहे. या गुन्ह्यात हाती लागलेले तीनही दरोडेखोर हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही नाशकातील नांदगाव, येवला, औरंगाबादमधील वैजापूर, गंगापूर आणि अहमदनगरमधील कोपरगाव, नगर तालुका पोलीस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसह शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.
--इन्फो--
लवकरच ‘मोक्का’अन्वये कारवाई
या तिघा सराईत दरोडेखोरांपैकी, सचिन ऊर्फ बोंग्या हा वाखारी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार होता. हाती आलेल्या तिघांव्यतिरिक्त आणखी काही गुन्हेगार अद्यापही सक्रिय आहेत का? याचा पोलीस शोध घेत आहेत. या तिघांचा पुर्वेतिहास बघता लवकरच त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असून या दरोडेखरांच्या टोळीची पाळेमुळे ग्रामीण पोलीस नष्ट करणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
---
फोटो आर वर ०६वाखारी नावाने सेव्ह.