जमावाकडून दगडफेक : विल्होळी गावाच्या शिवारात महामार्गावर कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 10:16 PM2017-12-07T22:16:03+5:302017-12-07T22:17:36+5:30
विल्होळी गावातील कोळीवाडा परिसरातील नागरिकांनी महामार्गावर धाव घेतल्याने मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. अपघातानंतर चालकाने कंटेनर सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याचे लक्षात येताच संतप्त गावक-यांच्या जमावाने कंटेनरला लक्ष्य केले.
नाशिक : भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत विल्होळी गावाच्या शिवारात महामार्गावर पादचारी तरूण जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी (दि.७) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती समजताच गावातील मोठा जमाव महामार्गावर जमला. संतप्त जमावाने अपघातग्रस्त वाहनावर दगडफेक केली.
याबाबत नाशिक तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी, विल्होळी गावाजवळ भीमा लक्ष्मण आचारी (३५, रा.कोळीवाडा) यांना नाशिकवरून मुंबईकडे भरधाव जाणारा कंटेनरने (एम एच १५ई.जी७९७७) जोरदार धडक दिली. या धडकेत आचारी हे कंटेनरच्या पाठीमागील चाकांखाली सापडून जागीच ठार झाले. घटनेची माहिती समजताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. विल्होळी गावातील कोळीवाडा परिसरातील नागरिकांनी महामार्गावर धाव घेतल्याने मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. अपघातानंतर चालकाने कंटेनर सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याचे लक्षात येताच संतप्त गावक-यांच्या जमावाने कंटेनरला लक्ष्य केले. कंटेनरवर दगफे कर करुन संतापाला वाट मोकळी करुन दिली. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनरचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार विश्वास देशमुक करीत आहेत.
विल्होळी, वाडीव-हे परिसरात महामार्गावर सातत्याने होणा-या अपघातांच्या घटनांमुळे नाहक जीव गमवावा लागत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या महामार्गावर भरधाव वेगाने वाहने धावत असून रात्रीच्या सुमारास गावांच्या जोड रस्त्यांकडेही वाहनचालक दुर्लक्ष करत असल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. महामार्गा प्राधिकरण व प्रादेशिक परिवहन विभागाने महामार्गांवर वाहनचालकांची तपासणी मोहिम राबविण्याची मागणी होत आहे. बहुतांश वाहनचालक मद्याच्या नशेत बेभानपणे वाहतुक करीत असल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच महामर्गालगतच्या गावांच्या जोडरस्त्यांच्या प्रारंभी दर्शनी भागात मोठ्या अकााराचे सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारण्याची गरज आहे.