सिडकोच्या चौपाटीवर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; अग्निशमन दलाचा जवान भाजला
By अझहर शेख | Published: April 30, 2024 04:47 PM2024-04-30T16:47:53+5:302024-04-30T16:48:30+5:30
सिडको परिसरातील लेखानगर येथे महामार्गावरील उड्डाणपूलाला लागून समांतर रस्त्यालगत चायनीज विक्रेत्यांनी अनधिकृतपणे चौपाटी थाटली आहे.
नाशिक : सिडको अग्निशमन दलाच्या उपकेंद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लेखानगर चौपाटीवरील चायनीज विक्री करणाऱ्या हातगाड्यांपैकी तीन हातगाड्यांना मंगळवारी (दि.३०) मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवित असताना अचानकपणे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. जोरदार प्रेशरमुळे फायरमन राजेश जयराम हाडस (४५,रा. गणेश कॉलनी, उत्तमनगर) हे दुरवर फेकले गेले व आगीच्या ज्वालांनी त्यांना वेढल्याने ते गंभीररित्या भाजले आहे. तसेच यावेळी मदतकार्यासाठी पुढे आलेले राहुल गणोरे, अमोल खंदारे हे नागरिकही जखमी झाले आहेत.
सिडको परिसरातील लेखानगर येथे महामार्गावरील उड्डाणपूलाला लागून समांतर रस्त्यालगत चायनीज विक्रेत्यांनी अनधिकृतपणे चौपाटी थाटली आहे. मंगळवारी २ वाजून ५१ मिनिटाला आग लागल्याचा ‘कॉल’ सिडको अग्निशमन दलाच्या केंद्राला दुरध्वनीवरून प्राप्त झाला. यानंतर तत्काळ बंबासह जवान लीडींग फायरमन अविनाश सोनवणे, राजेश हाडस, कांतीलाल पवार, बंबचालक इस्माइल काझी, प्रशिक्षणार्थी यश वझरे, पार्थ शिंदे हे घटनास्थळी पोहचले. त्यावेळी किसन थापा यांच्या मालकीची चायनिज विक्रीची हातगाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दुकानांवर पाण्याचा मारा करत आग विझविण्यास सुरूवात केली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी हे केंद्रप्रमुख प्रदीप परदेशी यांनी धाव घेतली होती. आगीने रौद्रावतार धारण करू नये, यासाठी तातडीने दुसऱ्या बंबासह जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जवानांनी पुढील अर्ध्या तासात आग नियंत्रणात आणली. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिलीप ठाकुर यांच्यासह रात्रीचे गस्तीपथकही घटनास्थळी दाखल झाले होते.