दिंडोरी तालुक्यात शिक्षकांकडून कोविड सेंटरला भरीव मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:40+5:302021-05-23T04:14:40+5:30
दिंडोरी येथील प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांनी एकत्र येत कोविडसाठी सुमारे नऊ लाख चाळीस हजारांचा निधी जमा केला होता. सदर ...
दिंडोरी येथील प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांनी एकत्र येत कोविडसाठी सुमारे नऊ लाख चाळीस हजारांचा निधी जमा केला होता. सदर निधीतून त्यांनी पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, आवश्यक वैद्यकीय उपकरणे साहित्य व दिंडोरी येथील कोविड सेंटरसाठी आर्थिक मदत विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पंचायत समितीत आरोग्य विभागास सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी झिरवाळ बोलत होते. तालुक्यातील शिक्षक हे ज्ञानार्जनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत आहेत. अनेक ठिकाणी शिक्षकांनी डिजिटल शाळा, वाचनालय यात योगदान दिले असून ऑनलाइन शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मोबाइल उपलब्ध करून दिले आहे. लसीकरण मोहिमेतही शिक्षकांनी योगदान द्यावे, असे आवाहन झिरवाळ यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, जि. प. सदस्य भास्कर भगरे, गटशिक्षणाधिकारी कनोज यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक समन्वय समितीतर्फे सचिन वडजे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन धनंजय वानले यांनी केले. प्रल्हाद पवार यांनी आभार मानले.
इन्फो
आरोग्य विभागाला सूचना
वणी व दिंडोरीत ऑक्सिजन प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे, तर बोपेगाव व ननाशी येथील ऑक्सिजन बेड सुविधेचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. सदर सेंटर हे तात्पुरते करण्याऐवजी इतर आजारांवरील उपचारासाठी त्याचा वापर व्हावा, अशा सूचना झिरवाळ यांनी आरोग्य विभागाला दिल्या.