मस्त जगुया आनंदाने मंत्र मुळी हा सोडू नका...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:46 AM2018-01-02T11:46:50+5:302018-01-02T11:49:24+5:30
नाशिक कवी काव्यमेळाव्यास दाद
नाशिक : ‘पहिलं प्रेम असतं पहिल्या पावसानंतरच्या मातीच्या सुगंधासारखं’, ‘दिवसरात्र भूमिका जगते ते आईचे पात्र असते’ या आणि अशा विविध क वितांचे सादरीकरण नाशिक कवी संस्थेतर्फे आयोजित काव्य मेळाव्यात करण्यात आले. वा. गो. कुलकर्णी कलादालन येथे आयोजित या कार्यक्रमात कवींनी विविध कवितांचे सादरीकरण केले.
मेळाव्याची सुरुवात भरत शहा यांनी ‘माझं पहिलं प्रेम’ या कवितेने केली. यानंतर विलास पंचभाई यांनी ‘किड्या-मुंग्यांसारखी माणसं असतात, जिथे मिळाला विसावा तिथे विसावतात’, ‘ही पोटाची आग’ ही कविता सादर केली. अतुल देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘कितीक सरले कितीक उरले, आयुष्याला मोजू नका’ या कवितेने कार्यक्रमात विशेष रंगत आणली, तसेच डॉ. मंजूषा पुरंदरे यांनी यावेळी सादर केलेल्या ‘हायकू’ या प्रकारालाही उपस्थित कवींनी विशेष दाद दिली.
या मेळाव्याप्रसंगी नाशिक कवीचे सदस्य असलेले गोकुळ वाडेकर, सोनाली चव्हाण, गणेश चव्हाण, कस्तुर शेळके, डॉ. सुधीर करमरकर, प्रभा कोठावदे, राधाकृष्ण साळुंखे आदींनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. या काव्यमेळाव्या अंतर्गत कवी गोकुळ वाडेकर यांनी सादर केलेल्या ‘टाहो जुन्या दिसांचा’ या कवितेला प्रथम, डॉ. मंजूषा पुरंदरे यांच्या हायकू काव्यप्रकाराला द्वितीय आणि गणेश सोनवणे यांनी सादर केलेल्या ‘भुंगा’ या कवितेला तृतीय क्रमांक मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्याम पाडेकर यांनी नवकवींना कविता सादरीकरण पद्धतीबाबत मार्गदर्शन केले तर अनिल माळी यांनी आपल्या क वितेतून जंगल सफरीचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. यावेळी प्रमुख पाहुणे श्याम पाडेकर आणि अनिल माळी यांच्यासह नाशिक कवीचे कार्याध्यक्ष शरद पुराणिक उपस्थित होते.