सहा राज्यांतून शंभर किलो सोने लूटणारा कुख्यात सुबोधसिंग नाशिकच्या दरोड्याचा मास्टरमाइंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:31 PM2019-06-25T18:31:08+5:302019-06-25T18:37:49+5:30
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील कुख्यात गुंड सुबोधसिंग उंटवाडी ‘मुथूट’ दरोड्याचा मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. सुबोधसिंग सध्या तुरुंगात असला तरी त्याने तुरुंगातून त्याच्या हस्तकांच्या टोळीशी
नाशिक : देशभरातील सहापेक्षा अधिक राज्यांमधील विविध शहरांत मुथूट, मण्णपुरम फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांवर सशस्त्र दरोडे टाकून सुमारे शंभर किलोपेक्षा अधिक सोन्याच्या दागिन्यांची लूट करणारा बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील कुख्यात गुंड सुबोधसिंग उंटवाडी ‘मुथूट’ दरोड्याचा मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. सुबोधसिंग सध्या तुरुंगात असला तरी त्याने तुरुंगातून त्याच्या हस्तकांच्या टोळीशी संपकर् ात राहून दरोडा टाकण्यास भाग पाडल्याची कबुली या दरोड्यातील शूटर सराईत गुंड परमेंदर सिंग याने पोलिसांना दिली आहे.
मागील वर्षी पाटणा पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर व सोने लुटीच्या घटनांचा मास्टरमाइंड असलेल्या सुबोधसिंगला अटक केली होती. तो कारागृहात शिक्षा भोगत असला तरी त्याचे हस्तक उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यांमध्ये सक्रिय असल्याने तो कारागृहातून त्यांच्या संपकर् ात राहून दरोड्याच्या घटना घडवून आणत असल्याचे आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत संबंधित कारागृहाच्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुबोधसिंगवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्टत परराज्यातून येऊन धाडसी दरोड्याच्या घटना थांबविण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. मुथूट फायनान्स दरोडा व खुनाच्या गुन्ह्यात सुबोधसिंगचा हस्तक परमेंदर हाती लागला आहे. परमेंदरसह त्याच्या दहा साथीदार असे एकूण ११ सराईत दरोडेखोरांनी हा हल्ला घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरोड्यातील मूळ शूटर परमेंदर हा ५ जून रोजी कार्बन नाका सातपूर परिसरात दाखल झाला. त्याला आकाशसिंग राजपूत याने फोन करून बोलावून घेतले. परमेंदर काही वर्षे उत्तर प्रदेशच्या एका माजी मंत्र्याच्या घरात भाडेतत्त्वावरदेखील राहात होता, असे तपासात पुढे आले आहे. हा सुबोधसिंगचा मुख्य हस्तक आहे. त्याच्या इशा-यावरूनच कट रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
शहरात १५ दिवस मुक्काम
या गुन्ह्यातील संशयित राहूल व अनुज उर्फ पप्पू, परमेंदर, जितेंद्रसिंग राजपूत, आकाशसिंग राजपूत हे संशयित आरोपी दरोडा टाकण्यापुर्वी शहरात १५ दिवस मुक्कामी होते. त्यांनी गुगुलमॅपच्या अधारे परिसरातील रस्त्यांची माहिती करून घेत नकाशे तयार केले. त्यानुसार संपुर्ण भागाची प्रत्येकाने ‘रेकी’ केली. परमेंदर हा दोन ते तीन वेळा सकाळच्या सुमारास फायनान्स कार्यालयात गौरवसिंग नावाने ये-जा क रून आला होता.