पाणीचोरीवरून मातोरीचे ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 11:50 PM2018-10-27T23:50:10+5:302018-10-27T23:50:32+5:30
मातोरी गावासाठी वरदान ठरलेल्या पाझरतलावातून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्याने पातळी खालावली असून, संबंधितांवर कारवाईसाठी गावातील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामपंचायत व पोलीसपाटील यांनी मध्यस्थीने वाद टाळला आहे.
मातोरी : मातोरी गावासाठी वरदान ठरलेल्या पाझरतलावातून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्याने पातळी खालावली असून, संबंधितांवर कारवाईसाठी गावातील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामपंचायत व पोलीसपाटील यांनी मध्यस्थीने वाद टाळला आहे. यंदा पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे आत्तापासूनच शेतकºयांना भविष्यातील दुष्काळाची चाहूल लागली असून, पाण्यावरून वाद होत आहेत. तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी खूपच खालावली असून, मातोरीकरांना संजीवनी ठरणारा पाझरतलाव महिनाभरात कोरडाठाक पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया आळंदी धरणातील आवर्तने कमी होऊ नये व जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी सय्यद पिंपरी, आडगाव, मातोरी, मखमलाबाद, दरी, मनोली येथे शेतकरी सभा घेत असताना गावातील पाझरतलावातील पाणी मखमलाबाद गावातील संपत पिंगळे यांनी मोटारीच्या सहाय्याने शेतीसाठी उपसण्यास सुरुवात केली आहे.
सुमारे महिनाभर चाललेल्या या पाणीचोरीमुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याबाबत संबंधितांना समजही देण्यात आली.
जनावरांसाठी पाणी शिल्लक ठेवावे
पाणीचोरी होत असल्याचे दिसत असताना शुक्रवारी शेतकरी एकवटले व त्यातून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सरपंच शरद तांदळे व पोलीस पाटील रमेश पिंगळे, ग्रामसेवक मवाळ यांनी सदर मोटारपंप काढून घेण्याची व शेतकºयावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने वाद टळला. मातोरीच्या पाझरतलावात जेमतेम स्वरूपात पाणी साठा शिल्लक राहिला असून, निदान जनावरांना जगण्यासाठी तरी पाणी शिल्लक ठेवावे, अशी शेतकºयाची मागणी आहे.