अविश्वास ठराव मंजुरीसाठी जुळवाजुळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:17 AM2018-08-28T01:17:35+5:302018-08-28T01:17:53+5:30
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर महापालिकेचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या पाच अष्टमांश म्हणजेच ७७ नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर महापालिकेचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या पाच अष्टमांश म्हणजेच ७७ नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. महापौरांसह सर्वच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क मोहिमा राबविल्या. भाजपाचा अविश्वास ठराव म्हणजे नाटक असल्याचा आरोप करीत राष्टÑवादीने अगोदरच अंग काढून घेतले असून, सरसकट करवाढ रद्द केल्यास आयुक्तांच्या पाठीशी राहू असे सांगत शिवसेना आणि मनसेने जराशी सबुरीची भूमिका घेतली आहे. तर कॉँग्रेसकडून भाजपाला पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. मनपाच्या ६१ प्रभागातून १२२ नगरसेवक निवडून आले असून, पाच स्वीकृत सदस्य आहेत. स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. याचा विचार केला तर १२२ सदस्यांच्या पाचअष्टमांश याचा अर्थ ७६.२५ इतक्या नगरसेवकांचे ठरावाच्या बाजूने मतदान होणे आवश्यक आहे. मनपात भाजपाचे ६६ नगरसेवक असले तरी सुदाम नागरे यांच्या निधनामुळे ६५ नगरसेवक आहेत. त्यांना ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी आता १२ नगरसेवकांची गरज आहे. त्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. कॉँग्रेसच्या वतीने त्यांना नगरसेवकांची रसद मिळणे अटळ असून, कॉँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यात भूमिका निश्चित केली जाईल, असे कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे यांनी सांगितले. तर यापूर्वी भाजपाने ठराव मांडल्यास त्यांच्या सोबत राहू म्हणणाºया बहुतांशी राजकीय पक्षांनी आता सबुरीची भूमिका घेतली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसने तर अगोदरच करवाढीच्या संदर्भात लोकांसोबत असलो तरी राज्यात सत्ता असताना भाजपाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मांडलेला ठराव म्हणजे नाटक आणि दिशाभूल करणारा प्रकार असल्याचे मत खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केल्याने त्यांचा अविश्वास ठरावात सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीमुळे तीनशे ते दीड हजारपट पट्टी वाढली आहे. एकमुखाने करवाढ रद्द करण्याचा ठराव केल्यानंतरदेखील त्याबाबत अंमलबजावणी झाली नाही उलट करवाढीच्या नोटिसा नागरिकांना दिल्या जात आहेत. हा नाशिककरांचा अपमान आहे. त्यामुळेच ही वेळ आली आहे. करवाढीचा मुद्दा सोडल्यास आयुक्तांच्या बरोबर असल्याची शिवसेनेची भूमिका विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी स्पष्ट केली आहे. तर मनसेचे गटनेता सलीम शेख यांनीदेखील अविश्वास ठरावाला समर्थन दिले असले तरी आयुक्तांनी करवाढ रद्द केल्यास या प्रस्तावाला समर्थन नसेल असे स्पष्टीकरण दिले.
आयुक्तांनी बालहट्ट सोडल्यास समर्थन
आयुक्तांच्या विकासकामांना आणि प्रशासनातील सुधारणांना पाठिंबा आहे. मात्र करवाढ तसेच सण, उत्सव साजरे करण्याची परंपरा यांना छेद देणे आणि नाशिककरांच्या भावनांशी खेळणे योग्य नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांना विनंती आहे की त्यांनी घरपट्टीवाढीचा बालहट्ट सोडावा, म्हणजे अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. पक्षाच्या संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना नाशिक महापालिकेतील स्थितीबाबत कळविण्यात आले असून वरिष्ठांकडून याबाबत आदेश येतील त्यानुसार सभागृहातच भूमिका स्पष्ट केली जाईल. - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता
तर समर्थन नसेल
महासभेत करवाढ रद्द करण्याचा निर्णय होऊन तब्बल महिनाभराचा कालावधी लोटला आहे. मात्र आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. आयुक्तांची भूमिका लोकहिताच्या विरोधात असल्यानेच त्यांच्या विरोधातील अविश्वासाच्या प्रस्तावाला समर्थन दिले आहे. मात्र लोकभावनेचा विचार करून आयुक्तांनी करवाढ रद्द केल्यास या प्रस्तावाला समर्थन दिले जाणार नाही. - सलीम शेख, गटनेता