जाऊबार्इंमध्ये अटीतटीचा सामना
By admin | Published: February 16, 2017 11:05 PM2017-02-16T23:05:12+5:302017-02-16T23:05:32+5:30
सत्तासंघर्ष : शिवसेना, भाजपापुढे राष्ट्रवादीचे आव्हान
अतुल शेवाळे मालेगाव
जिल्ह्याच्या राजकारणात दाभाडी गावाचा कायमच वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे गटावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये सरळ तिरंगी लढत होत आहे. या गटात देराणी - जेठाणी यांच्यात सामना होत आहे, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने तगडे आव्हान उभे केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून माजी मंत्री प्रशांत हिरे यांचा दबदबा दाभाडी गटावर दिसून येत होता. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात दाभाडी मतदारसंघ अस्तित्वात होता. कालांतराने मतदारसंघाच्या पुनर्चनेत मालेगाव बाह्य मतदारसंघ नावारूपाला आला. परिणामी जिल्हा परिषदेचा दाभाडी गटात सत्ता टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून दाभाडी गटाला ओळखले जायचे. मात्र मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख व सध्या भाजपावासीय झालेले विद्यमान जि.प. सदस्य संदीप पाटील यांनी शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावत या गटावर मनसेचा झेंडा फडकविला होता. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी जि.प. सदस्य अरुण देवरे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. शिवसेनेने विद्या निकम यांना तर भाजपाने संगीता निकम यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. या दोघीही देराणी-जेठाणी आमने-सामने असल्यामुळे भाऊबंदकीपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने शिवसेना-भाजपाला तगडे आव्हान देत अंजना देवरे यांना उमेदवारी बहाल केली आहे.
एकाच गावातील तीन उमेदवार विविध पक्षांनी दिल्यामुळे गावकीचे राजकारण तापले आहे. सध्या गटात पक्षनेतृत्वाच्या सभांचा धडाका सुरू आहे. या गटातील पाटणे गणातही तिरंगी लढत होत आहे. शिवसेनेने टेहरे येथील नंदलाल शेवाळे, तर भाजपाने त्याच गावातील अरुण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकाच गावातील दोघ उमेदवार असल्यामुळे गावकीचे राजकारण तापले आहे. शेतीच्या बांधापर्यंत प्रचाराचा धुराळा उडविला जात आहे. या गणात राष्ट्रवादीने मुरलीधर खैरनार यांना उमेदवारी दिली आहे. या विभागणीमुळे धक्कादायक निकाल समोर येण्याची चिन्हे आहेत तर दाभाडी गण यंदा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी झाली नाही. शिवसेनेने मनीषा माळी, भाजपाने कमलाबाई मोरे तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने द्वारकाबाई गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. गट मोठा असल्यामुळे रिंगणातील उमेदवारांची प्रचारासाठी दमछाक होत आहे.
दाभाडी गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. पक्षनेतृत्वाने कस लावीत उमेदवाऱ्या बहाल केल्या आहेत. मात्र दाभाडीत एकाच घरातील देराणी- जेठाणी यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने शिवसेना, भाजपापुढे तगडे आव्हान उभे करीत. जि.प.चे माजी सदस्य अरुण देवरे यांच्या घरातील महिलेला उमेदवारी दिल्यामुळे दाभाडीत मोठी चुरस दिसून येत आहे.