राजापूरच्या विहिरीत आढळली सर्पाची जुळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:17 PM2020-05-22T17:17:28+5:302020-05-22T17:17:37+5:30
बघ्यांची गर्दी : वनविभागाने सोडले नैसर्गिक अधिवासात
राजापूर : येथील गोपाळा गोविंदा वाघ यांच्या विहिरीत आढळलेल्या सर्पांची जुळण वनविभागाने सुखरूप बाहेर काढून वनहद्दीत सोडून दिली. मात्र, ही जुळण पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती.
सुमारे आठ फूट लांबीचे धामण जातीच्या सर्पांची जोडी (जुळण) गोपाळा वाघ यांचे ७० फूट असणाऱ्या विहिरीत असलेली संजय वाघ यांनी पाहिली. त्यांनी वनसेवक पोपट वाघ यांना याबाबत माहिती दिली असता, वनसेवक वाघ यांनी नांदगाव येथील सर्पमित्र विजय बडोदे यांना तात्काळ फोन करून बोलावून घेतले. बडोदे यांनी, दोरीच्या साह्याने विहिरीत उतरून दोन्ही सर्प सुखरु प बाहेर काढले. यावेळी संजय वाघ, विजय वाघ, किरण दराडे, मच्छिंद्र नाईकवाडे, मच्छिंद्र मगर, प्रविण वाघ, पवन नाईकवाडे, रामा वाघ, नितिन गोसावी, साईनाथ वाघ, राजेंद्र वाघ आदी शेतकऱ्यांनी त्यांना मदत केली.
सर्पमित्र बडोदे यांनी याबद्दल माहिती देतांना सांगीतले की, दोन्ही सर्प धामण जातीचे असून नर व मादी आहे. त्यांची लांबी सुमारे आठ फूट आहे. फेब्रुवारी ते जून हा धामण जातीच्या सर्पांचा मिलन काळ असतो. ब-याच ठिकाणी या सापाची जुळण या काळात आढळून येते. हे सर्प पूर्णपणे बिनविषारी असून त्यांची लांबी मोठी असल्यामुळे लोक भीती पोटी या सर्पांना मारतात. सध्या कडक उन्हाळा असल्याने हे सर्प गारव्याच्या ठिकाणी फिरतांना आढळतात. तर कधीकधी पाण्याच्या शोधातही हे सर्प लोकवस्ती जवळ गारव्यात येतात. दरम्यान, सदर धामण जातीच्या सर्पांच्या जोडीची वनविभागात नोंद करण्यात आली असून त्यांना वनहद्दीत पाण्याच्या सोईने सोडण्यात आले.