साहित्य खरेदी चौकशी गुलदस्त्यात पशुसंवर्धन विभाग : सभापती केदा अहेरांचा आरोप
By admin | Published: December 10, 2014 01:29 AM2014-12-10T01:29:14+5:302014-12-10T01:31:33+5:30
साहित्य खरेदी चौकशी गुलदस्त्यात पशुसंवर्धन विभाग : सभापती केदा अहेरांचा आरोप
नाशिक : गेल्यावर्षी कामधेनू योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साहित्य खरेदी प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने नेमकी काय चौकशी केली? कोणावर दोषारोप ठेवला याबाबत माहिती अद्याप गुलदस्त्यात असून, याबाबत आपण माहिती मागितली असल्याचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी सांगितले. या साहित्य खरेदी प्रकरणी तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सर्व साधारण सभेत शिवसेना गटनेते प्रवीण जाधव यांनी केले होते. त्यानंतर याप्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष जयश्री पवार यांनी तत्कालीन समाजकल्याण सभापती राजेश नवाळे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य यतिन पगार व प्रवीण जाधव तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व जळगाव जिल्हा अतिरिक्त पशुसंवर्धन संचालक यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या कक्षात या चौकशी समितीची बैठकही झाल्याचे कळते. तर याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांची अन्यत्र बदली करण्याचा प्रस्तावही शासनाला पाठविला होता. त्यावरून डॉ. भिकमसिंह राजपूत यांची नाशिक जिल्हा परिषदेतून अन्यत्र बदली होऊन त्यांच्या जागी रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुंडलिक बागुल यांची नाशिकला बदली झाली होती. यासंपूर्ण साहित्य खरेदी प्रकरणाच्या सखोेल चौकशीसाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने नेमकी काय चौकशी केली? त्यात दोषी कोण आढळले? कोणावर काय कारवाईची शिफारस संबंधित समितीने केली? याबाबत आपण माहिती मागविल्याचे सभापती केदा अहेर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)