सेस निधीतून ७२ वैकुंठ रथांसह ५०० भजनी मंडळांना साहित्य
By धनंजय रिसोडकर | Published: November 2, 2023 01:39 PM2023-11-02T13:39:11+5:302023-11-02T13:39:47+5:30
जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात इमारत व दळणवळण विभागाकडे साडेसहा कोटी रुपये सेसनिधी वर्ग करण्यात आला आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून दीड कोटी रुपयांचे वैकुंठ रथ खरेदी करण्यास गत महिन्यातच मान्यता दिल्यानंतर या सर्वसाधारण सभेत एक कोटींच्या सेस निधीतून जिल्ह्यातील भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या वर्षामध्ये ७२ वैकुंठ रथ तसेच जवळपास पाचशे भजनी मंडळांना भजनसाहित्य मिळू शकणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात इमारत व दळणवळण विभागाकडे साडेसहा कोटी रुपये सेसनिधी वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेला सेसनिधीतून वैकुंठ रथ व भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेने सेसनिधीचे पुनर्विनियोजन करून त्यातील अडीच कोटी रुपयांचा निधी वैकुंठरथ व भजनी मंडळांना भजन साहित्य यासाठी वळवण्यास प्रशासकांनी मान्यता दिली. सध्या याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून त्याला तांत्रिक मान्यता घेतली जात आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी सेसनिधीतून जिल्ह्यातील भजनीमंडळांसाठी भजन साहित्य खरेदी करण्याच्या ग्रामपंचायत विभागाच्या प्रस्तावास मान्यता दिली. आता या खरेदीबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हा परिषदेने सेस निधीसाठी कलाकारांना मदत या लेखाशीर्षाखाली या कामाला मान्यता दिली असली, तरी या पद्धतीची ही पहिलीची खरेदी आहे. त्यामुळे या खरेदीच्या प्रस्तावाच्या तांत्रिक मान्यतेच्या मुद्द्याबाबत अद्याप तरी संभ्रम आहे.