यंदाच्या वर्षी साकारणार माता - बाल रुग्णालय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:16 AM2021-01-03T04:16:18+5:302021-01-03T04:16:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या माता-बाल रुग्णालयाचे काम अर्धवट झाल्यानंतर कोरोना काळात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या माता-बाल रुग्णालयाचे काम अर्धवट झाल्यानंतर कोरोना काळात ते पूर्णपणे ठप्प झाले होते; मात्र आता कोरोनाचा बहर ओसरल्याने पुढील महिन्यापासून या रुग्णालयाच्या उर्वरित कामास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे येत्या वर्षात जिल्ह्यात या माता-बाल रुग्णालयाचे काम पूर्णत्वाला जाऊ शकणार आहे.
जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांपूर्वी माता-बाल रुग्णालयाच्या उभारणीस मंजुरी आणि निधी प्रदान करण्यात आला. त्यानंतर काही काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे काम पुढील निधीअभावी ठप्प झाले होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस या तीन मजली इमारतीचे बांधकाम दोन वर्षांपासून सुरू आहे. प्रारंभी पहिल्या मजल्याचे काम झाल्यानंतर निधीअभावी काम अडकले होते. त्यानंतर निधी मिळाल्यावर पुन्हा पुढील मजल्यांच्या कामास प्रारंभ झाला. सरत्या वर्षातच रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन त्याच्या कामकाजास प्रारंभ होणे अपेक्षित होते; मात्र वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच कोरोनाला प्रारंभ झाल्यापासून काम ठप्प पडल्याने तिसऱ्या मजल्याचे काम अपूर्णच राहिले आहे.
१०० खाटांचे रुग्णालय
जिल्हा रुग्णालयातील या नूतन रुग्णालयासाठी राज्य शासनाने १० कोटींचा निधी प्रशासनाकडे सुपूर्ददेखील केला आहे. या तीन मजल्यांवर मिळून सुमारे २० हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यात सध्या १०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार अधिकाधिक माता-बालकांना तिथे सामावून घेणे शक्य व्हावे, अशाच स्वरूपाची इमारतीची रचना करण्यात येत आहे.
अत्याधुनिक यंत्रांनी राहणार सुसज्ज
जिल्ह्यातील आदिवासी भागातून, खेड्या-पाड्यातून येणाऱ्या अनेक माता अशक्त असतात, त्यामुळे त्यांची बालकेदेखील कुपोषित जन्माला येतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रीमॅच्युअर बेबी, अशक्त आणि विविध प्रकारच्या आजारांनी बालकांच्या मृत्यूदराचे प्रमाण वाढते; मात्र या रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने हे रुग्णालय सामान्य, अतिसामान्य घरांतील माता-बालकांसाठी वरदान ठरणार आहे.
कोट
सहा महिन्यात काम पूर्ण
कोरोनाकाळात मजूर येत नसल्याने माता-बाल रुग्णालयाचे कामकाज ठप्प झाले होते; मात्र आता या रुग्णालयाचे काम पुन्हा जोमाने सुरू करण्यात आले आहे. येत्या सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी या नूतन रुग्णालयातील सेवेला प्रारंभ होऊ शकेल, तसेच या स्वतंत्र माता-बाल रुग्णालयामुळे या बालमृत्यु दरावर अधिकाधिक नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
डाॅ. रत्ना रावखंडे , जिल्हा शल्य चिकित्सक
आकड्यात
१० कोटींचा निधी रुग्णालयासाठी मंजूर
१०० खाटांची रुग्णालयात सुविधा
०३ मजली भव्य इमारत
२० हजार चौरस फुटांचे रुग्णालय
फोटो
०२ पीएचजेएन ९१