आधाराश्रमात वाहतोय मातृवात्सल्याचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:27 AM2019-05-12T00:27:12+5:302019-05-12T00:27:12+5:30

आईसारखे दैवत जगात दुसरे नाही, अशी मातृप्रेमाची महती गायली जाते. परंतु ज्या मुलांना आईचे प्रेम मिळू शकत नाही, अशा मुलांची मातृप्रेमाने काळजी घेणाऱ्या माता आधाराश्रमात दिसतात, तेव्हा आई-मुलांमध्ये येथे रक्ताचे नाते नसले तरी मायेच्या नात्याने एक वेगळाच आदर्श आजच्या समाजापुढे निर्माण झालेला दिसतो.

 Maternal flowing stream in the house | आधाराश्रमात वाहतोय मातृवात्सल्याचा झरा

आधाराश्रमात वाहतोय मातृवात्सल्याचा झरा

Next

जागतिक  मातृदिन विशेष

नाशिक : आईसारखे दैवत जगात दुसरे नाही, अशी मातृप्रेमाची महती गायली जाते. परंतु ज्या मुलांना आईचे प्रेम मिळू शकत नाही, अशा मुलांची मातृप्रेमाने काळजी घेणाऱ्या माता आधाराश्रमात दिसतात, तेव्हा आई-मुलांमध्ये येथे रक्ताचे नाते नसले तरी मायेच्या नात्याने एक वेगळाच आदर्श आजच्या समाजापुढे निर्माण झालेला दिसतो. त्यामुळे गोदाकाठावर मातृवात्सल्याचा जणूकाही झराच आधाराश्रमात वाहतोय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
गोदाकाठावरील घारपुरे घाटानजीक इ.स. १९५४ मध्ये आधाराश्रमाची स्थापना झाली. इ. स. १९७० पासून या संस्थेतून आतापर्यंत ९५० मुले दत्तक देण्यात आली. त्यातील ६३ मुले ही परदेशातील जोडप्यांना दत्तक दिली गेली आहेत. मागील वर्षी २२ मुले भारतातील विविध भागातील दाम्पत्यांनी दत्तक घेतली, तर एक मूल परदेशातील जोडप्याने दत्तक घेतले आहे, अशी माहिती दत्तक समन्वयक राहुल जाधव यांनी दिली.
आधाराश्रमातील शालिनी बोडके, शीला चव्हाण, ज्योती तुरे, सुनीता लांडगे आदींसह सर्वच महिला व पुरुष कर्मचारी १३२ मुला-मुलींची देखभाल करण्यासाठी सदैव कार्यरत असतात. सध्या आधाराश्रमात सुमारे ७० कर्मचारीवर्ग असून, बहुतांश महिला कर्मचारी असल्याने त्या या सर्व मुलांची मायेच्या ममतेने काळजी घेताना दिसतात. येथील मुलांचा दिनक्रम ठरलेला असतो. त्यानुसार त्यांना सकाळी आंघोळ झाल्यावर नाश्ता देणे, दुपारचे जेवण तयार करून सर्व मुलांना जेवण वाढणे, सायंकाळी पुन्हा नाश्ता, रात्री ८ वाजता पुन्हा जेवण अशा प्रकारे दिवसभर या सर्व महिलांचा कामांमध्ये वेळ जातो, परंतु मुलांच्या प्रेमापोटी त्यांना हे कष्ट वाटत नाही, उलट एकप्रकारे वात्सल्यभाव आणि समाधान त्यांच्या चेहºयावर जाणवते.
वयाच्या ६ वर्षांपर्यंत मुलांना आणि वयाच्या १२व्या वर्षांपर्यंत मुलींना येथे ठेवण्यात येते. या ठिकाणी पोलिसांना सापडलेली अनाथ मुले आणि कुमारी मातांची मुले बालकल्याण समितीच्या आदेशानेच दाखल करून घेण्यात येतात. सर्व प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण करण्यात येते. या ठिकाणी आई-वडील नसलेली किंवा आई नसल्याने कुटुंब मुलांना सांभाळण्यास असमर्थ असल्यास दाखल होतात. या सर्व मुलांचा खर्च शासकीय अनुदान आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीवर शक्य होतो.
..अशी झाली मातृदिनाची सुरुवात
जगभरात दि. १२ मे हा ‘मदर्स डे’ म्हणजे जागतिक मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसे पाहिले तर प्रत्येक दिवस हा आईचाच असतो. परंतु धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आईला जास्त वेळ देऊ शकत नाही. मातृदिन हा मे महिन्याच्या दुसºया रविवारी साजरा करण्यात येतो, परंतु काही देशांमध्ये तो वेगवेगळ्या तारखांनादेखील साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात अमेरिकेत झाली असून, व्हर्जिनिया प्रांतातील अ‍ॅना जार्विस नावाच्या महिलेने या दिवसाची सुरुवात केली, असे म्हटले जाते. भारतातदेखील मे महिन्याच्या दुसºया रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो.
भारतीय संस्कृतीतील स्थान
भारतीय संस्कृतीत मातेला देवतेचे स्थान दिले आहे. त्याचप्रमाणेच बाळाचा पहिला गुरु म्हणून आईलाच मान मिळतो. वाङमयात देखील आईची अनेक गीते, काव्य आणि कथा प्रसिद्ध आहेत. भारतीय कुटुंबपद्धतीत प्राचीन काळी मातृसत्ताक पद्धती होती. त्यामुळे निर्णयाचा अधिकार देखील मातेलाच मिळत असे.
छोट्या बाळांची विशेष काळजी
सर्व मुले दत्तक जाईपर्यंत आधाराश्रमात अगदी आनंदात राहतात. त्यांची काळजी घेण्यासाठी परिचारिका असून, आधाराश्रमातील कर्मचारीदेखील सदर मुलांची काळजी घेण्यासाठी धावपळ करीत आहेत.
आधाराश्रमात सध्या एकूण १३२ बालके असून, या बालकांचा अत्यंत निगुतीने सांभाळ करण्यात येत आहे. त्यातील २८ मुले ही अत्यंत लहान वयोगटातील असून, त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. विशेष म्हणजे या ठिकाणी या महिन्यात दोन अत्यंत छोटी बाळे आली असून, त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title:  Maternal flowing stream in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.