गढईपाडयावरील पोरांना मातृत्वाचा ओलावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 03:52 PM2019-02-08T15:52:03+5:302019-02-08T15:52:53+5:30
सामाजिक दायित्व : जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पेठ : नाशिकसारख्या शहरात वास्तव्यास राहून सर्व सुखसोयींनी युक्त जीवनाचा आनंद घेणाऱ्या भगिनींनी पेठ तालुक्यातील गढईपाडयावरील चिमुकल्यांच्या सहवासात आख्खा दिवस घालवला आणि टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरीत झालेल्या मजुरांची पोरं काही काळ मायेच्या पंखाखाली आली.
गढईपाडा या आदिवासी पाडयावरील सर्व पालक मजुरीसाठी इतरत्र स्थलांतरीत होत असतात. प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेणारी मुले आजी- आजोबा किंवा आपल्या मोठया भाऊ बहिणींच्या सोबत राहतात. अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ज्ञानाचे धडे गिरवणा-या आदिवासी बालकांची गरज ओळखून नाशिक येथील सौ.किरण चांडक यांच्या संकल्पनेतून सौ. रोशनी राठी, शितल लढ्ढा, आरती, रमा, किरण आदी भागिनींनी गढईच्या ५४ मुलांसाठी शूज , सॉक्स, वॉटरबॅग, साबण, बिस्कीट, चॉकलेट आदी वस्तू आणल्या. पाडयावरच्या गृहिणींनी चुलीवर बनवलेल्या नागालीच्या भाकरी, ऊडदाचं बेसन, ठेचा, कांदा अशा अस्सल गावरानं मेनूचा आनंदाने स्विकार केला. एकमेकांचा निरोप घेतांना मुलांच्या चेह-यांवरील आनंद आणि भगिनींच्या डोळ्यांतील प्रेम दिसून येत होते. याप्रसंगी पेठचे गट शिक्षणाधिकारी संतोष झोले, मुख्याध्यापक आर.डी. शिंदे, शिक्षक मनोहर जाधव,गणू राऊत, तारा गोबाले, काशीबाई शिंगाडे यांचे सह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. मनोहर जाधव यांनी सूत्रसंचलन केले.