५० दिवसांत १५० महिलांवर प्रसूती शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 09:34 PM2020-05-26T21:34:08+5:302020-05-27T00:05:21+5:30
मालेगाव मध्य : कोरोनाच्या दहशतीमुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालये बंद अवस्थेत असतानाच मनपाच्या अली अकबर रुग्णालयाच्या अवघ्या दहा जणांच्या बळावर ५० दिवसांत सुमारे १५० शस्रक्रिया (सिझेरियनसह) ५०० प्रसूती केल्या. कोरोनाच्या भयामुळे दडून बसलेल्या डॉक्टरांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.
मालेगाव मध्य : कोरोनाच्या दहशतीमुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालये बंद अवस्थेत असतानाच मनपाच्या अली अकबर रुग्णालयाच्या अवघ्या दहा जणांच्या बळावर ५० दिवसांत सुमारे १५० शस्रक्रिया (सिझेरियनसह) ५०० प्रसूती केल्या. कोरोनाच्या भयामुळे दडून बसलेल्या डॉक्टरांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.
८ एप्रिल रोजी शहरात एकदम पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यापैकी एकाचा अहवाल येण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाल्याने शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालये बंद झाली होती. याच दरम्यान महिलांच्या प्रसूतीसाठी समोर एकमेव पर्याय होता तो अली अकबर रुग्णालय. येथे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व १६ परिचरिकांचा स्टाफ कार्यरत होता, परंतु शहरात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता शासनाने जीवन व मन्सुरा येथे कोविड-१९ रुग्णालय तातडीने उभारण्यात आले. त्यामुळे मनपाचे वाडिया रुग्णालय पूर्णत: बंद करून येथील व कॅम्प, अली अकबर रुग्णालयातील काही आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड-१९ केंद्रात नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे अली अकबर रुग्णालयात १६ पैकी अवघ्या चारच परिचारिका उरल्याने येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण दहा जणांची टीम कार्यरत आहे, मात्र मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अली अकबर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सायका जबीन अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. तहसीन गुलाम हैदर, डॉ. अमरीन इस्हाक, डॉ. सय्यद अकबरी मोहम्मद, डॉ. सय्यद साजीद मुस्ताक, डॉ. साजीद खान व सिस्टर स्वाती पाटील, मनीषा पवार, वैशाली चव्हाण व सविता साळुंखे यांनी सकाळ, दुपार व रात्र अशा तिन्ही पाळीत नियोजनबद्ध पद्धतीने कर्तव्य बजावत एप्रिल महिन्यात ८८ सिझरसह ३४१ प्रसूती करीत ७०१ गर्भवती महिलांची तपासणी केली, तर १ ते २० मे पर्यंत ५७ सिझरसह १५१ महिलांची प्रसूती केली. ४५० गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली. संकटसमयी शहरातील गोरगरीब जनतेला मोठा आधार देत हजार कुटुंबांना मोठ्या विवंचनेतून बाहेर पडण्यात मोलाची कामगिरी बजावत त्यांनी एक आदर्श निर्माण केला
आहे.