माथाडी संपाचा मार्केटवर परिणाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:12 AM2018-11-28T01:12:30+5:302018-11-28T01:13:01+5:30
राज्यातील अनेक मोठ्या बाजार समितीतील माथाडी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या लाक्षणिक संपाचा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोणताही परिणाम जाणवला नाही,
पंचवटी : राज्यातील अनेक मोठ्या बाजार समितीतील माथाडी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या लाक्षणिक संपाचा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोणताही परिणाम जाणवला नाही, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सूत्रांनी दिली आहे. माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणारे शेकडो माथाडी कामगार संपात सहभागी झालेले आहेत.
मुंबईतील वाशी बाजार समितीत माथाडी कामगार संघटना असून, मंगळवारी वाशी बाजार समितीतील व्यवहार पूर्णपणे बंद असल्याने नाशिक बाजार समितीतून गुजरात राज्यात आणि मुंबई उपनगरात शेतमालाची नेहमीप्रमाणे निर्यात झाल्याने फळ व पालेभाज्यांवर कोणताही परिणाम जाणवला नाही. नाशिक कृषी बाजार समितीच्या पेठरोड येथील कांदा बाजारात माथाडी कामगार युनियन असून, मंगळवारी सुमारे ३० ते ३२ कामगार नेहमीप्रमाणे कामावर हजर असल्याचे बाजार समिती सचिव अरुण काळे यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईकडे शेतमाल वाहने नियमित रवाना झाली.