पारंपरिक मतांवर ठरणार उमेदवारांच्या विजयाचे गणित
By Admin | Published: November 18, 2016 10:54 PM2016-11-18T22:54:17+5:302016-11-18T22:54:31+5:30
दुरंगी, तिरंगी लढत : विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
नांदगाव : प्रभाग क्र. ५ व ६ मधील काही लढती एकतर्फी होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्र. ५ मध्ये केवळ १८१० मतदार आहेत. अ मधील लढती तिरंगी व ब मधील दुरंगी होत असल्याचे चित्र कागदावर दिसत आहे.
विशाल खैरनार (५ अ) (काँग्रेस), संजीव वाघ (अ) (भाजपा), किरण देवरे (अ) (शिवसेना).
अक्का सोनवणे (ब) (काँग्रेस), वंदना कवडे (ब) (शिवसेना).
कवडेंचा हा पारंपरिक मतदार आहे. कै. रामराव कवडे, बाळासाहेब कवडे, चंद्रशेखर कवडे, राजेश कवडे हे यापूर्वी येथून निवडून गेले होते. कवडे यांचे सामाजिक काम असून, पाणीटंचाईच्या काळात बोअरचे पाणी स्वत: पाइपलाइन टाकून त्यांनी पुरवले आहे. वंदना चंद्रशेखर कवडे सुशिक्षित उमेदवार असून, त्यांचे दीर राजेश कवडे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत.
आक्का सोनवणे यांची उमेदवारी अरुण पाटील यांच्यामुळे झाली आहे. त्या होलार समाजाच्या असून, १२ वर्षांपूर्वी राजेश बनकर नगराध्यक्ष असताना त्यांच्यावर अविश्वास ठराव आला होता. त्यावेळी मुंबईच्या रस्त्यावर झालेल्या नाट्यमय घडामोडींच्या त्या साक्षीदार आहेत. अहेर यांच्या कंपूतून त्या बनकर यांच्याकडे गेल्याने बनकरांवरचा अविश्वास ठराव बारगळला होता.
५ अ मध्ये शिवसेनेचे शहर अध्यक्ष किरण देवरे उभे आहेत. ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. राजेश कवडे यांचे नाव आल्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन कवडे यांनी शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदासाठी व देवरे यांनी प्रभागातून निवडणूक लढवावी असे ठरले. त्यांच्यासमोर विशाल खैरनार व संजीव वाघ आहेत. वाघ आरएसएसचे असून, त्यांची उमेदवारी गुरुकृपानगर व भाजपा माइंडेड मतदारांच्या भरवशावर आहे. तसे त्या भागाला नवखे असले तरी सामाजिक कामांमधून वेगळी ओळख निर्माण केली आहे. (वार्ताहर)