बचत गटाच्या माध्यमातून मथुराबाईंनी केले महिलांचे सक्षमीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 11:35 PM2022-03-07T23:35:26+5:302022-03-07T23:36:44+5:30
पुरूषोत्तम राठोड घोटी : इगतपुरी सारख्या अतिदुर्गम भागात अन्नपूर्णा बचत गटाची सोळा वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. त्यावेळी दहा महिलांना ...
पुरूषोत्तम राठोड
घोटी : इगतपुरी सारख्या अतिदुर्गम भागात अन्नपूर्णा बचत गटाची सोळा वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. त्यावेळी दहा महिलांना सोबत घेऊन बचत गटाच्या अध्यक्ष उद्योजिका मथुरा जाधव यांनी बचत गटाची स्थापना केली. अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी महिलांचा या बचत गटात समावेश करून त्यांना उद्योगाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी व सक्षम करण्यासाठी रोजगार उभा केला आहे.
या बचत गटाने हातसडीचे तांदूळ, जात्यावरचे दळलेले भाजणीचे पीठ, हिरवा मसाला, कुरडया, पापड्या बनवण्याचा उद्योग सुरू केला होता. त्याच्या विक्रीसाठी जिल्हा पातळीवर मथुरा जाधव यांनी विक्री केंद्रे सुरू केली होती. आज याच बचत गटाने वुमन्स पॉवर कंपनीची निर्मिती केली असून, लवकरच मोठा उद्योग या माध्यमातून उभा राहणार आहे. अन्नपूर्णा बचत गटाच्या माध्यमातून २००६ साली म्हैस पालन व पोळी भाजी केंद्राची स्थापना केली. इगतपुरी तालुक्यात शंभर बचत गटांची स्थापना करुन महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त केले व ग्राम संघाची स्थापना केली. वुमन पॉवर फार्मर प्रोड्यूसर कंपनीने २० गुंठ्यांचे क्षेत्र २९ वर्षांच्या करारावर भाड्याने घेतले असून लवकरच या जागेवर मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. लाकडी तेल घाणा प्रोजेक्टमध्ये मुंबईतील ओबीसी इंडियन चेंबर्स यांच्याशी ५ वर्षांचा करार करण्यात आला आहे. उत्पादित झालेला मालही कंपनी विकत घेणार आहे.
अतिदुर्गम भागातील महिलांसाठी उद्योगक्षेत्रात ही पर्वणी ठरणार असून महिला सक्षमीकरण हे या कंपनीचे मूळ उद्दिष्ट आहे. या सोळा वर्षाच्या काळामध्ये ग्रामीण भागातील महिलांना एका छत्राखाली आणून त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून एक विशिष्ट व्यवसाय सुरु करण्यामागे मथुरा जाधव यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कामाची दखल घेत २००९ साली बचत गटांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते जिजाऊ पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून उत्कृष्ट बचत गट म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
विविध घटकांतील महिलांना एकत्र आणून सोळा वर्षांच्या मोठ्या तपानंतर वुमन्स पॉवर फार्मर प्रोड्यूसर कंपनीची निर्मिती केली. या कंपनीच्या माध्यमातून लाकडी तेल घाणा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शासनस्तरावर या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.
- मधुरा जाधव, घोटी.