मथुरेच्या रंगोत्सवाची नाशिककरांना सफर
By admin | Published: March 19, 2017 09:57 PM2017-03-19T21:57:33+5:302017-03-19T21:57:33+5:30
समारोप : ‘रंग बरसे’ छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक : मथुरेमधील राधाचे गाव बरसाना आणि कृष्णाचे नंदगाव. या दोन्ही गावांमध्ये सुमारे चाळीस दिवस चालणारा होळीचा रंगोत्सव. लड्डू होली, लठमार होली, होरंगा होली अशा विविध प्रकारच्या होळींच्या रंगोत्सवाची अनोखी सफर नाशिककरांनी छायाचित्रांच्या माध्यमातून अनुभवली.
निमित्त होते, छायाचित्रकार सचिन पाटील यांनी गेल्या वर्षी टिपलेला मथुरेचा रंगोत्सव त्यांनी नाशिककरांसाठी प्रदर्शनातून सादर केला. गंगापूररोडवरील हार्मनी गॅलरीमध्ये आयोजित ‘रंग बरसे’ छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप रविवारी (दि.१९) झाला. यावेळी रंगोत्सवाच्या छटा बघण्यासाठी छायाचित्रप्रेमींनी गर्दी केली होती. मथुरेतील होळीचा रंगोत्सव जगप्रसिद्ध आहे.
या रंगोत्सवाचे जसे भारतीयांना अप्रूप आहे तसेच विदेशी छायाचित्रकारांनाही आहे. रंगोत्सवाच्या आगळ्या-वेगळ्या छटा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी विदेशी छायाचित्रकारांची याठिकाणी झुंबड उडते. महिला, पुरुषांचा पारंपरिक पोशाख, विविध नैसर्गिक कोरड्या रंगांची होणारी उधळण आणि या रंगात न्हाऊन निघालेले येथील नागरिक अशी ही रंगांची जत्रा पाटील यांनी छायाचित्रांमध्ये बंदिस्त करून नाशिककरांपुढे सादर केली. प्रदर्शनात एकूण ५५ छायाचित्रे मांडण्यात आली होती. मथुरेचा हा रंगोत्सव न्याहाळताना प्रत्येक छायाचित्रप्रेमी दंग झाला होता.